गोदाप्रेमी नागरी समितीचा आरोप
गंगापूर धरणातील गाळाचा विचार न करता जलसाठय़ाचे मोजमाप केले जात असल्याची साशंकता व्यक्त करत २०१२ मध्ये मार्चच्या स्थितीचा विचार करता सध्या तुलनेत अधिक जलसाठा असूनही शहरवासीयांवर कपातीचा भार टाकण्याचे कारण काय, असा प्रश्न गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने उपस्थित केला आहे. आकडेवारीचा खेळ करून नाशिककरांवर अन्याय करणाऱ्या घटकांचा शोध घेण्याची मागणी समितीने केली आहे.
या संदर्भातील सविस्तर आकडेवारी समितीचे प्रमुख देवांग जानी यांनी सादर केली आहे. सध्या नाशिकमध्ये दैनंदिन पाणीपुरवठय़ात १५ टक्के, तर आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जातो. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर, गंगापूर धरणाने तळ गाठल्याने ही कपात लागू करण्यात आली आहे. यामुळे शहरातील अनेक भागात टंचाईच्या प्रश्नांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. ज्या धरणातून नाशिकला पाणीपुरवठा केला जातो, त्या गंगापूर धरणाची जलसाठय़ाची क्षमता जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार १५९.४२ मिलियन क्युबिक मीटर (दलघमी) आहे. २००२ मध्ये मेरीने गंगापूर धरणातील गाळ काढण्यासंबंधी सर्वेक्षण केले होते. त्यात गाळामुळे धरणाची क्षमता २७ टक्क्याने कमी झाल्याचे स्पष्ट केले. या गाळाचा उपसा करून तो टाकण्यासाठी २१८७.५० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. या गाळाची उंची अंदाजे २०० मीटर होईल. गाळ उपसा करणे आणि वाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च अपेक्षित आहे. गाळ काढण्यावर इतका खर्च करण्याऐवजी किकवी धरण प्रकल्पासाठी ५५० कोटी रुपये लागणार आहेत. गंगापूरमधील गाळाचे सर्वेक्षण २००२ मध्ये झाले होते. त्यानंतर १३ वर्षांत त्यात आणखी गाळ साचलेला असू शकतो.
जलसंपदा विभागाच्या ४ मार्च २०१६च्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणात एकूण साठवणूक क्षमता १५९ दशलक्ष घनमीटर पैकी उपयुक्त पाणीसाठा ५४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३४ टक्के आहे. वास्तविक, याआधी झालेल्या गाळ सर्वेक्षणाचा आधार घेऊन जलसाठय़ाची आकडेवारी निश्चित करणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीतील आकडवारी फुगलेली दिसते. राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार दोन कोटी भाविक सिंहस्थ पर्वणीत येऊन गेले. साधुग्राममध्ये आखाडय़ांना केला गेलेला चार महिन्यांचा पाणीपुरवठा वेगळा. कुंभमेळ्यानिमित्त अतिरिक्त पाण्याचा भार महापालिकेने उचललेला असताना नाशिककरांच्यावतीने जिल्हा प्रशासनाची ही वस्तुस्थिती उच्च न्यायालयात युक्तिवादात मांडायला हवी होती. तसे घडले असते तर मराठवाडय़ासाठी पाणी सोडावे लागले नसते, याकडे जानी यांनी लक्ष वेधले. जलसंपदा विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार २०१२ मार्चमध्ये गंगापूरमध्ये ३६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा होता. सध्या हा साठा ५४ दशलक्ष घनमीटर आहे. १८ दशलक्ष घनमीटरने अधिकचा पाणीसाठा आज उपलब्ध असताना पाणीटंचाई, पाणीकपातीचा अधिभार नागरिकांवर टाकण्याचे कारण काय, असा प्रश्न समितीने केला आहे.