महापालिकेचे वरातीमागून घोडे; सर्वेक्षणात सहभागी ६०० शिक्षक समस्यांच्या विळख्यात

नाशिक :  करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने ६०० शिक्षकांची फौज मैदानात उतरवत घरोघरी सुरू केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षकांना विमा कवच न देता हे काम सुरू करण्यात आले आहे.  याच दरम्यान म्हसरूळ विभागात एक शिक्षक सकारात्मक आढळल्यानंतर पालिकेला आरोग्य विम्यासाठीचे अर्ज भरून घेण्याची उपरती झाली.

पालिकेने आपल्या शाळांमधील तब्बल ६०० शिक्षकांच्या मदतीने घरोघरी इतर आजार असणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. मागील महिन्यात विहित कार्यक्रमानुसार सुरू होणारे हे सर्वेक्षण साहित्याची वेळेवर उपलब्धता न झाल्यामुळे विलंबाने सुरू झाले होते. सर्वेक्षण सुरू करताना सहभागी शिक्षकांची आरोग्य तपासणी झाली नाही. त्यांना विमा संरक्षण दिले गेले नाही. घरोघरी जाण्यासाठी संरक्षक पोषाखाची मागणी झाली. पण त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नव्हती, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. आठ दिवस सर्वेक्षण कामात शिक्षकांनी सहभागी व्हावे, यासाठी पालिका आयुक्तांनी आदेश काढले होते. त्याची मुदत १ ऑगस्टला संपुष्टात आली. मात्र, आजही सर्वत्र हे काम आदेशाविना करावे लागत असल्याकडे शिक्षक लक्ष वेधत आहेत. याच काळात एक शिक्षक सकारात्मक आढळल्याने सर्व जण धास्तावले. संबंधितांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन दाद मागितली. तेव्हा प्रशासनाने संबंधित व्यक्ती आधीपासून सकारात्मक असेल असे सांगून हात झटकले. नंतर लगेच शिक्षकांकडून आरोग्य विम्याचे अर्ज भरून घेतले गेले. १५ दिवसांपासून सर्वेक्षण केले जात असताना इतक्या विलंबाने हे अर्ज भरले गेले.

शिक्षक संघटनांनी सर्वेक्षणातील अडचणींबाबत प्रशासनाला निवेदन दिले. महापालिकेतील ६०० शिक्षकांवर संपूर्ण शहरातील कुटुंब सर्वेक्षणाचे काम दिल्याने प्रत्येकावर मोठी जबाबदारी पडली आहे. एका शिक्षकाने दररोज १८० घरे करावी असे पालिकेला अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात ४० ते ५० घरांपर्यंत पोहोचणे शक्य होते. त्यामुळे आणखी खासगी शिक्षकांची मदत दिल्यास हे काम लवकर होईल. प्रत्येक शिक्षकास दिलेले तापमानमापक, हातमोजे आदी साहित्य पुरेसे नाही. शिक्षकांना सर्वेक्षणासोबत आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणाचे काम पाहावे लागते अशा अनेक बाबी शिक्षकांनी मांडल्या आहेत.

सर्वेक्षणावेळी धक्कादायक अनुभव

सर्वेक्षणावेळी पुरेशी माहिती न देणे, अन्य आजार असणाऱ्या व्यक्तीची माहिती दडवणे, करोनाची लक्षणे असूनही माहिती न सांगणे, असभ्य वर्तन करणे, दरवाजा न उघडणे असे प्रकार घडत असल्याकडे शिक्षक संघटनांनी लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या मनात करोनाविषयी भीतीचे वातावरण आहे. यामुळे त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. सकारात्मक रुग्णाच्या घरासमोर फलक नसल्याने अशा व्यक्तींच्या संपर्कात आल्याने शिक्षकांनाही करोनाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांच्या वैद्यकीय उपचाराची तरतूद आणि ५० लाखाचे विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.