भाजप हा रावण असून कपटी शत्रू आहे. तो पाठीमागून लढणार आहे. समोरून लढल्यास त्यांचा समाचार घेता येईल. भाजपचा पराभव ही बाळासाहेबांना मानवंदना ठरणार असून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या वतीने रविवारी सिन्नरसह देवळाली, सिडको, नाशिकरोड, शालिमार येथील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी विधानसभा मतदारसंघनिहाय लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांमध्ये मार्गदर्शन करतांना खा. राऊत यांनी प्रामुख्याने भाजपवरच तोंडसुख घेतले. काँग्रेस, राष्ट्रवादीचा आपण पराभव करू शकतो, परंतु सत्ता, संघटन असलेल्या भाजपचा पराभव करतांना खूप काळजी घ्यावी लागेल. सत्ता आणि पैशाच्या जोरावर भाजप सेनेला संपविण्याच्या विचारात आहे, परंतु ते कधीच शक्य होणार नाही. भाजपला शिवसेनेची ताकद खूपत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात  उत्तर महाराष्ट्राच्या ताकदीवरच महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल. शिवसैनिकांनी आपले बालेकिल्ले अधिक मजबूत करावेत. महापालिकेत शिवसेनेला बहुमत मिळाले नाही. आपण का हरलो, संघटन व व्यक्तींमध्ये काही दोष आहेत काय, याविषयी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पुढील विधानसभा, महापालिका निवडणुकीची तयारी आतापासूनच करण्याची आवश्यकता आहे, असे राऊत यांनी सांगितले.

यावेळी मेळाव्यांमध्ये काही विभागप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांच्यादृष्टीने कोणकोणती तयारी करणे आवश्यक आहे, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये कोणती उणीव राहिली याविषयी मत मांडले. महापालिका निवडणुकीत ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवारांमुळे निष्ठावंतांमध्ये नाराजीची भावना निर्माण होऊन शिवसेना वाढीला त्याचा फटका बसत असल्याचेही काही जणांनी निदर्शनास आणून दिले. व्यासपीठावर संपर्क प्रमुख अजय चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, माजी मंत्री बबन घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख अजय बोरस्ते, आ. योगेश घोलप, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर आदी उपस्थित होते.