• इच्छुकांच्या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची धास्ती
  • मनसेकडून पहिली यादी जाहीर
  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे त्रांगडे कायम

साधारणत: १० ते १२ दिवसांपूर्वी मुलाखत प्रक्रिया पार पाडणाऱ्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करताना अक्षरश: धाबे दणाणले आहेत.  अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशीच्या पूर्वसंध्येपर्यंत यादी जाहीर करण्याचे धारिष्टय़ भाजप, शिवसेना आदी प्रमुख पक्षांना दाखविता आले नाही. मात्र, पालिकेत सत्ताधारी राहिलेल्या मनसेने पहिली यादी जाहीर केली आहे. परिणामी, इच्छुकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला असून त्याचे चटके प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांना बसण्यास सुरूवात झाली आहे. चिघळलेल्या स्थितीमुळे भाजपने यादी जाहीर न करण्याचे निश्चित करत अखेरच्या दिवशी उमेदवारांना थेट पक्षाचे अधिकृत अर्ज (एबी फॉर्म) देणार असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेना आपल्या मुखपत्रातून यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले जाते. जागा वाटपाचा घोळ मिटला नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे त्रांगडे कायम राहिले. या एकंदर स्थितीत अखेरच्या दिवशी इच्छुकांच्या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे.  गुरूवारी सायंकाळपर्यंत मनसे वगळता एकाही राजकीय पक्षाने आपापली उमेदवारी यादी जाहीर केली नाही. राज्यात व केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या भाजप व शिवसेनेत इच्छुकांची संख्या अतिशय मोठी आहे. यादी आधी जाहीर केल्यास बंडखोरीला उधाण येईल हे लक्षात घेऊन या दोन्ही पक्षांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपली यादीच जाहीर केली नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षीयांनी आपली यादी जाहीर करणे टाळले. या गदारोळात मनसेने प्रथम आपली यादी जाहीर करत आघाडी घेतली. इतर पक्षांची यादी जाहीर होत नसल्याने आणि अधिकृत यादीतून पत्ता कट होणार असल्याची जाणीव झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अखेरच्या क्षणी अन्य पक्षात प्रवेश करत िरगणात उतरण्याची तयारी केली आहे. अखेरच्या टप्प्यात अतिशय वेगाने या घडामोडी घडत असताना वर्षभर तयारी करत, मुलाखती देऊन यादीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या इच्छुकांची अस्वस्थता संतापात रुपांतरीत होण्यास सुरूवात झाली आहे.

sharad pawar
पवारांच्या कोंडीसाठी मुंबई बाजारसमिती लक्ष्य?
Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
yavatmal washim lok sabha marathi news
यवतमाळ- वाशिममध्ये महायुतीच्या उमेदवारीचा संभ्रम कायम

मुखपत्रातून यादी जाहीर होण्याची शक्यता

शिवसेनेच्या गोटात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. भाजप पाठोपाठ मुलाखती घेऊनही सेनेने अखेरच्या दिवशीपर्यंत यादी जाहीर केली नाही. सायंकाळी उशिरा अथवा शुक्रवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून उमेदवारांची यादी जाहीर होऊन एबी फार्म दिले जातील, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बाहेरून आलेल्यांमुळे सेनेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे तिकीट कापले गेल्याची वंदता आहे. संबंधित नेत्यांनी अंतिम क्षणी भाजप वा इतर पक्षात जाऊन निवडणूक लढविण्याचा जंग बांधला आहे. सेनेचे असे काही ज्येष्ठ नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याची अफवाही पसरली आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडीचा घोळ मिटला नाही. सात ते आठ जागांबाबत उभयतांमध्ये मतभेद आहेत. अर्ज दाखल करण्याची घटीका संपुष्टात येण्यास अवघे काही तास शिल्लक असताना संबंधितांकडून तोडगा निघाला नाही. आघाडीबाबत काय होईल, यावर प्रमुख पदाधिकारी लवकर तोडगा निघेल इतकेच सांगतात. यामुळे या दोन्ही पक्षांनी सायंकाळपर्यंत आपली यादी जाहीर केलेली नव्हती. भाजप व सेनेतील बंडखोरांना ऐनवेळी आपल्या पक्षाकडून रिंगणात उतरविण्याची रणनिती संबंधितांनी ठेवल्याचे सांगितले जाते. यादी जाहीर होणे वा ती जाहीर न करता एबी फॉर्म देणे ही प्रक्रिया झाल्यानंतर इच्छुकांच्या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची धास्ती व्यक्त होत आहे.

पालकमंत्री धारेवर

भाजप व शिवसेनेच्या बहुतांश प्रमुख नेत्यांनी भ्रमणध्वनी उचलणे बंद केले आहे. भाजपने सर्वात आधी इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली होती. यादी जाहीर करण्यासाठी नाशिक येथे पालकमंत्री गिरीश महाजन दाखल झाले. उमेदवारीसाठी पक्षातील अंतर्गत स्पर्धा गगनाला भिडल्याने भाजपने यादी जाहीर करणे टाळले. यादीसाठी ताटकळणाऱ्या इच्छुकांनी महाजन यांच्या गाडीभोवती गर्दी करत विविध प्रश्नांचा भडिमार केल्याचे सांगितले जाते. उमेदवारी यादी जाहीर करावी, अशी मागणी संबंधितांनी केली. दिवसभर सातत्याने इच्छुकांकडून याबद्दल विचारणा होत नसल्याने नेते व पदाधिकारी त्रस्तावले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादीच जाहीर न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी थेट एबी फॉर्म उमेदवारांना दिला जाणार आहे. निवडून येण्याची क्षमता हा उमेदवारीसाठी एकमेव निकष असून काही विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होणार असल्याचे संकेत महाजन यांनी दिले. भाजप घराणेशाही जोपासणार नाही. परंतु, काम करणाऱ्या नेत्यांतील घरातील इच्छुकांना तिकीटे दिली जातील, असेही त्यांनी सूचित केले. बंडखोरी फारशी होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.