नाशिक : महायुतीत नाशिकच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा तीनही पक्षांच्या नेतेमंडळींच्या एकत्रित बैठकीनंतर सुटेल, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा फुले जयंतीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना, भुजबळ यांनी भाजपकडून कमळाच्या चिन्हावर ही जागा लढविण्याचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचा पुनरुच्चार करतानाच, नाशिकची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितली असता दिल्लीतून ही जागा घ्या, पण भुजबळ यांना उमेदवारी द्या, असे सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ही माहिती आपल्याला समजली. यामागे नेमके काय समीकरण आहे, हे सांगता येत नाही, असा दावाही भुजबळ यांनी केला.

हेही वाचा >>>मालेगावात नमाज पठणवेळी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकला

तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून प्रचाराला वेग दिला असताना दुसरीकडे दोन आठवडे उलटूनही महायुतीत बेबनाव सुरू आहे. शिंदे गट ही जागा सोडण्यास तयार नसताना भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी या जागेसाठी आग्रही आहेत. यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता, भुजबळ यांनी महायुतीतील प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा करतील, तेव्हा हा तिढा सुटेल, असे सूचित केले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पािठबा दिल्याने महायुतीची ताकद निश्चितपणे वाढणार आहे. एक कार्यकर्ता पक्षात आला तरी आपल्याला आनंद होतो. राज ठाकरे हे मनसेचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रात त्यांचे नाव आहे. जनमानसावर त्यांचा प्रभाव आहे. ठाकरे यांनी पािठबा दिल्याने महायुतीची ताकद विस्तारणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal believes that nashik rift will be resolved in the grand alliance meeting amy