नाशिक : वेगवेगळ्या कारणांस्तव चर्चेत असलेल्या बागलाण पंचायत समिती कार्यालयात चिरीमिरीवरून लेखा विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, गटविकास अधिकाऱ्यांसमोर हा प्रकार घडूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बागलाण पंचायत समितीत काही महिन्यांपासून घरकुल, शौचालय, पाणीपुरवठा योजनांची कामे, टँकर वाटप या कामांवरून काही विशिष्ट अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी यांनी संगनमत केल्याची चर्चा होत आहे. यामुळे गटबाजी निर्माण झाली आहे. लेखा विभागाच्या वरिष्ठ-कनिष्ठ लेखापाल असलेल्या अनुक्रमे शार्दूल आणि पाटील यांच्यातही याच कारणावरून अनेक दिवसांपासून धुसफुस सुरू होती.

दोन दिवसांपूर्वी दुपारी लाभार्थ्यांना धनादेश वितरित केले होते. मात्र त्या बदल्यात मिळालेल्या चिरीमिरीच्या वाटाघाटीवरून शाब्दिक चकमक सुरू होती. त्याचे पर्यावसन गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षालगत असलेल्या लेखा विभागाच्या कार्यालयात शार्दूल आणि पाटील हेकर्मचारी मुद्दय़ावरून गुद्दय़ांवर आले. शिव्यांची लाखोली वाहिली. या घटनेने उपस्थितांना धक्का बसला. हा सर्व प्रकार गटविकास अधिकाऱ्यांसमोर घडत असताना त्यांनी भांडण सोडविण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. फ्री स्टाईलमुळे पंचायत समिती आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ग्रामविस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यात दोन गट निर्माण झाले आहेत. संघटनेच्या दबावाचा वापर करून पात्रता नसताना मर्जीतील व्यक्तीला ग्रामपंचायतीचा कार्यभार दिला जातो आहे. यामुळे पात्र, अनुभव असलेल्या ग्रामसेवकांवर अन्याय केल्याचे बोलले जाते. गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या नेत्यांकडून होत असलेल्या अन्यायामुळे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामसेवकामध्ये नाराजी पसरली आहे.