अनिकेत साठे

बाजारातील कापडसदृश पिशव्यांमध्येही प्लास्टिकच असल्याचा निष्कर्ष के.टी.एच.एम. महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाने प्रयोगातून काढला आहे. या प्रयोगाचे निष्कर्ष आता विधिमंडळात सादर केले जाणार आहेत.

प्लास्टिकबंदीनंतर बहुतांश दुकानांमध्ये मुलायम कापडाप्रमाणे (नॉनवुव्हन / स्पनबाँडेड) दिसणाऱ्या रंगीत पिशव्या दिल्या जात आहेत. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या नव्या पिशव्यांचे विघटन होत नसल्याने त्यादेखील पर्यावरणास घातक असल्याचा निष्कर्ष विद्यार्थ्यांनी प्रयोगाद्वारे काढला आहे. या प्रयोगातील तथ्यांश, त्या आधारे पडताळणी, अशा पिशव्यांचे उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध झालेली कारवाई आदींबाबत उपस्थित झालेल्या तारांकित प्रश्नांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ माहितीची जमवाजमव करीत आहे.

प्राचार्य व्ही. बी. गायकवाड आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. प्रतिमा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषम वाघचौरे, वैष्णवी शिंदे, काजल वाघ, शुभांगी शिरसाठ आणि वैशाली वाकाले या विद्यार्थ्यांनी सहा महिने या विषयावर काम केले. बंदीपूर्वी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आणि कापडसदृश पिशव्यांतील घटक फारसे वेगळे नसल्याचे या प्रयोगातून समोर आले आहे. या संशोधनावर ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाश टाकला होता.

आमदार दीपिका चव्हाण, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, राहुल जगताप, दत्तात्रय भारणे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत पर्यावरण विभागाकडे या संदर्भात विचारणा केली आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या संशोधनात कापडसदृश पिशव्यांमध्ये प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आल आहे.

पर्यावरण विभागाने याबाबत चौकशी केली का? चौकशीत काय आढळून आले? या पिशव्यांचे उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई झाली? कारवाई झाली नसल्यास विलंबाची कारणे काय? असे प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले आहेत.

विधान मंडळ सचिवालयातून तारांकित प्रश्नाची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहितीचे संकलन सुरू केले आहे. प्रश्नांना उत्तर देण्यासाठी महाविद्यालयाकडून संशोधन अहवाल मागवून घेण्यात आला असून मंडळाचे अधिकारी त्यावर अभ्यास करत आहेत.

प्रयोगातील निष्कर्ष काय?

बाजारातून १५ पिशव्यांचे नमुने संकलित करून प्रयोग करण्यात आले. नैसर्गिक परिस्थितीत मातीमध्ये पडून राहिल्यास योग्य आद्र्रता, तापमान आणि पीएच असेल तर पिशवीचे विघटन होते. या नमुन्यांचे चार महिने निरीक्षण करण्यात आले. या अंतर्गत १५ पैकी केवळ दोन पिशव्यांचे विघटन झाले. उर्वरित १३ पिशव्यांचे विघटन झाले नाही. त्यांचे नमुने तसेच राहिले. पिशव्यांमध्ये प्लास्टिक आहे की नाही, हे तपासण्यासाठी ‘फरियन ट्रॉन्स्फॉर्मेशन इन्फ्रा रेड’ तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. याद्वारे त्यात कमी-अधिक घनतेचे ‘पॉलिथीन’ अर्थात प्लास्टिक आढळले.