नाशिक : दोन आठवडय़ापूर्वी सहा अंशाची नीचांकी पातळी गाठल्यानंतर अंतर्धान पावलेल्या थंडीचे जानेवारीच्या अखेरीस पुन्हा जोरदार आगमन झाले आहे. एकाच दिवसात तापमान सहा अंशांनी घसरल्याने गुरुवारी शहर परिसरात पुन्हा हुडहुडी भरली. या दिवशी ७.९ अंशाची नोंद झाली.

थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये यंदा कडाक्याच्या थंडीसाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागली होती. नंतरही हवामानात चढ-उतार कायम असल्याचे अधोरेखित झाले. यावेळी १० अंशाची पातळी गाठण्यासाठी जानेवारीची प्रतीक्षा करावी लागली. जानेवारीच्या मध्यानंतर म्हणजे १७ तारखेला सहा अंश या नीचाकी पातळीची नोंद झाली होती. नंतर पारा आणखी खाली जाईल, अशी अपेक्षा असताना पुढील काळात तापमान वाढले. थंडीचा जोर ओसरला. तापमान १३ ते १४ अंशाच्या जवळपास पोहोचले.

थंडी गायब झाली असे वाटत असतांना नव्याने तिचे पुन्हा आगमन झाले. बुधवारी १३.९ इतके तापमान होते. गुरूवारी तापमान सहा अंशांनी कमी झाले. रात्रीपासून वातावरणात कमालीचा गारवा होता. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात गारठा अधिक आहे. सकाळी घराबाहेर पडणारे विद्यार्थी, चाकरमानी हबकले. त्यांना ऊबदार कपडय़ांचा पुन्हा आधार घेणे भाग पडले.

उत्तर भारतातील शीतलहरींचा प्रभाव जिल्ह्य़ाच्या वातावरणावर पडत असतो. गेल्यावेळी तापमान सहा अंशावर गेल्यावर थंडी मुक्काम ठोकेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. दोन-तीन दिवस गारवा जाणवला. नंतर वातावरणात बदल झाले.  आता तापमान ७.९ अंशावर आल्याने हंगामातील नवीन नीचांक नोंदला जातो का, याकडे सर्वाचे लक्ष आहे. गेल्या वर्षी नऊ फेब्रुवारीला चार अंश या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती.