*   साडय़ा, तयार कपडय़ांची कमी किमतीत विक्री

*  महिलांच्या गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी

महापुरामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी व्यावसायिकांनी प्रयत्न सुरू केले असून पावसात भिजलेल्या साडय़ा, तयार कपडे कमी किमतीत विक्रीस काढले आहेत. स्वस्तातील हा माल खरेदी करण्यासाठी सध्या मेनरोडसह नेहरू चौक परिसरात महिलांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नदीकाठावरील लोकांचे संसार उघडय़ावर पडले. विस्कटलेला डाव पुन्हा नव्याने मांडण्यासाठी नागरिक आपल्या सामानाची जुळवाजुळव करण्यात मग्न आहेत. तर काठावरील दुकानदार, व्यावसायिक मात्र दुकानातील चिखल गाळ, घाण साफ करून दुकान पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मेनरोडसह नेहरू चौक, दिल्ली दरवाजा, दहीपूल परिसरात

कापड विक्रेत्यांनी कपडय़ांसह

अन्य काही वस्तू कमी किमतीत विक्रीस काढल्या आहेत. पावसात भिजलेला माल कोरडा करून तो विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. साडय़ा, कूर्ती, टॉप्स, लेगीन्ससह महिलांशी संबंधित अन्य कपडे शंभर रुपयांपुढे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

स्वस्तातील माल घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उसळली असून या गर्दीमुळे काही दुकानांमधील माल अवघ्या काही तासांतच संपला. तर काही ठिकाणी किंमत कमी करण्यावरून महिला आणि विक्रेत्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीमुळे दहीपूल, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा परिसरात कमालीची वाहतूक कोंडी झाली होती.

गर्दीमुळे अवघ्या काही क्षणांचे अंतर पार करण्यासाठी दुचाकी चालकांना इतर गल्लीबोळांचा वापर करावा लागला. अद्याप गाळ काढण्याचे, दुकान स्वच्छतेचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्ते बंद आहेत. त्यामुळे नदीकाठ परिसरात जाणाऱ्या वाहनचालकांना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.