धुळे – मध्य प्रदेशातील सेंधव्याहून शिरपूरमार्गे पुढे जाणाऱ्या लसूण भरलेल्या मालमोटारीच्या तपासणीत पोलिसांना १० लाख ४० हजार रुपयांची ५२ किलो अफुची सुकलेली बोंडे आढळून आली. मुंबई ते आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ सोमवारी मध्यरात्री ही कारवाई झाली. या प्रकरणी चालक, सहचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मालमोटारीसह २५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पाथकाने ही कारवाई केली. निरीक्षक पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधाराने मध्य प्रदेशातील सेंधव्याकडून शिरपूरकडे जाणारी संशयास्पद मालमोटार पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर (ता. शिरपूर) गावाजवळ सोमवारी रात्री साडेबारा वाजता थांबवली. तपासणीत मालमोटारीमध्ये लसूण असल्याचे निदर्शनास आले. वरवर लसूण भरलेले हे वाहन पोलिसांनी खात्री करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणले. संपूर्ण वाहनाची तपासणी केली असता १० लाख ४० हजार रुपयांची ५२ किलो अफुची सुकलेली बोंडे (डोडा) आढळली. पोलिसांनी या कारवाईत १५ लाख रुपयांची मालमोटार, अफुची बोंडे असा २५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

हेही वाचा – धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात

पोलिसांनी वाहनातील चालक, सहचालक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सलामुद्दीन निजामुद्दीन (४२, दमाखेडी, जि. मंदसोर, मध्य प्रदेश) आणि सहचालक अशोक चौहान (३०, मानंदखेडा, जि. रतलाम, मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ निमित्त लावण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, कृष्णा पाटील, रफिक मुल्ला, जयराज शिंदे, संतोष पाटील, ठाकरे, प्रविण धनगर, मोहन पाटील, योगेश मोरे, स्वप्निल बांगर, संजय भोई, भुषण पाटील, रणजित वळवी यांनी केली. संशयित चालक, सहचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.