नाशिक – सदनिकेशी संबंधित प्रकरण जिल्हा ग्राहक मंचात लवकर सुनावणीस घेण्यासाठी आणि त्याकरिता हवी असलेली कागदपत्रे देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना मंचातील अभिलेखाकार धिरज पाटील आणि शिरस्तेदार सोमा भोये या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

या संदर्भात महिलेने तक्रार केली होती. तक्रारदाराने सावतानगर येथील राधा क्लासिक अपार्टमेंट या इमारतीत २७ लाख ५०० रुपयांना सदनिका नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी तीन लाख ७० हजार रुपये आगाऊ रक्कम दिली होती. परंतु, बांधकाम व्यावसायिकाने त्यांची फसवणूक करून त्यांच्या नावावर परस्पर इंडिया बुल्स वित्तीय संस्थेकडून कर्ज मंजूर करून पैसे घेतले. पण त्यांना सदनिकेचा ताबा दिला नाही. या संदर्भात तक्रारदाराने नाशिक जिल्हा ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. हे प्रकरण लवकर सुनावणीस घेण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या कामासाठी हवी असणारी कागदपत्रे देण्यासाठी अभिलेखाकार धिरज पाटीलने ५०० रुपयांची मागणी केली. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. रक्कम स्वीकारताना पाटील यास पकडण्यात आले. तर शिरस्तेदार भोये याने तक्रारदारास संशयित पाटीलला लाच देण्यास प्रोत्साहन दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन

हेही वाचा – नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव हे सापळा अधिकारी होते. सापळा पथकात हवालदार प्रणय इंगळे, सुनील पवार यांचा समावेश आहे.