धुळे – धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात ग्रामसेविकेस १५ हजार रुपयांची तर, साक्री पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या दोन्ही कारवाया सोमवारी सायंकाळी झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदखेडा तालुक्यातील चौगाव बुद्रुक येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम देण्यात आले होते. ते काम संबंधिताने पूर्ण केले. या कामावर झालेल्या खर्चाचे देयक तक्रारदारास देण्यात आले होते. परंतु, चौगाव बुद्रुक येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे देयक देण्यात आले नव्हते. यामुळे तक्रारदाराने एक महिन्यापूर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील (४७) यांची भेट घेऊन देयक देण्याची विनंती केली होती. परंतु, या देयकासह यापूर्वीचेही देयक काढून दिल्याच्या मोबदल्यात ग्रामसेविकेने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. विभागाने दाखल तक्रारीची पडताळणी केली. तक्रारदाराने ग्रामसेविकेशी तडजोड केल्यानंतर १५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार शिंदखेडा येथील राहत्या घरी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका राजबाई पाटील हिला रंगेहात पकडण्यात आले. शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

दुसरी घटना साक्री तालुक्यातील घाडदे येथे घडली. साक्री पंचायत समितीचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश (४२) यास एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. २०२३-२४ मध्ये साक्री तालुक्यातील घोडदे देशील तक्रारदार यांना शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुलाचे झालेल्या बांधकामाचे फोटो काढून नजरी तपासणी करून त्याचे मुल्यांकन साक्री पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदारांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश शिंदे याची भेट घेतली. शिंदेने तक्रारदाराचे मंजूर घरकुलाचे फोटो काढून नजरी तपासणी करून त्याचे मूल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर करून देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. लाचेची रक्कम सुरत महामार्गावरील घोडदे गावाच्या सर्व्हिस रस्त्यावर बस स्थानकाजवळ देण्याचे निश्चित झाले. एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिंदे यास रंगेहात पकडण्यात आले.

हेही वाचा – नाशिक: लाभार्थ्यांची जनावर खरेदी आचारसंहितेच्या कचाट्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, दीपाली सोनवणे या पथकाने ही कारवाई केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineer and female gram sevak caught accepting bribe in dhule district ssb
First published on: 16-04-2024 at 14:23 IST