नाशिक : दरी-मातोरी येथे डीजे चालकांना मारहाण, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित संदेश काजळेला २०१७ मध्ये शहर पोलिसांनी तडीपार केले होते. जीप खरेदीच्या नावाखाली महिलेची फसवणूक केल्याच्या प्रकरणात २०१९ मध्ये त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात काजळेला नऊ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. काजळेसह सराईत गुन्हेगारांविरुध्द नियमितपणे कारवाईचे सत्र राबविले जात असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.

गुन्हेगारी घटनांना लगाम घालण्यासाठी शहर पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांना तडीपार, सराईतांवर एमपीडीए आणि गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कान्वये कारवाईचे धोरण ठेवले आहे. दुसरीकडे दरी-मातोरी प्रकरणातील सर्व संशयित शहरातील आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई कशी झाली नाही, असा प्रश्न ग्रामीण पोलीस दलास पडला. उपरोक्त गुन्ह्य़ात सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून  न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अटकेत असणाऱ्या संशयितांविरुध्द दाखल गुन्ह्य़ांची माहिती ग्रामीणने शहर पोलिसांकडे मागितली आहे. मुख्य संशयित संदेश काजळेचे धागेदोरे मिळाले असून लवकरच त्याला अटक होईल, असा विश्वास ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

lokmanas
लोकमानस: धार्मिकतेला धर्मांधतेकडे वळविण्याचा प्रयत्न
Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा

शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, सराईत गुन्हेगारांचा शोध आदी मोहिमा नियमितपणे राबविल्या जातात, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी सांगितले. रात्री उशिरा हॉटेल तसेच तत्सम आस्थापना उघडे राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाते. शहर पोलिसांनी दरी-मातोरी प्रकरणातील संशयित संदेश काजळेवर २०१७ मध्ये तडीपारीची कारवाई केली होती. जुलै २०१९ मध्ये वाहन घेण्याच्या नावाखाली काजळेने महिलेची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. तेव्हां गुन्हा दाखल करून काजळेला अटक करून नऊ दिवसांची पोलीस कोठडी घेतली गेली होती.

फसवणुकीच्या गुन्ह्य़ाच्या आधारे प्रतिबंधात्मक कारवाई करता येत नाही. एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या गुन्ह्य़ांची नोंद असावी लागते. यामुळे ती कारवाई करता आली नाही. मधल्या काळात गंभीर स्वरुपाचे दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे नसल्याने काजळेवर पुन्हा तडीपारीची कारवाई करता आली नसल्याकडे शहर पोलिसांनी लक्ष वेधले. दरी-मातोरी प्रकरणातील अन्य सहा संशयितांपैकी एकावर अपघाताचा, तर दुसऱ्यावर भरधाव वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

विरोधकांचे आरोप तथ्यहीन – प्रा. देवयानी फरांदे

दरी-मातोरी येथे डीजे चालकांना मारहाण प्रकरणातील संशयितांशी आपले कोणतेही संबंध नाही. या संशयितांसाठी आपण कोणत्याही अधिकाऱ्यांना दूरध्वनी केलेला नाही. या घटनेशी आपला संबंध जोडून आपल्या परिवाराची बदनामी केली जात असल्याची तक्रार भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत त्या प्रकरणातील संशयितांवर भाजप आमदार प्रा. फरांदे यांचा राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात कारवाई करावी, यासाठी शनिवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, फरांदे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांचे आरोप तथ्यहीन ठरवले. दरी-मातोरी येथे डीजे चालकांना मारहाण, अत्याचाराची घटना निषेधार्ह आहे. या घटनेचे काही राजकारणी जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. पाच वर्षांत आपण पारदर्शक, लोकाभिमुख काम केल्यामुळे विरोधकांना आरोप करण्याची संधी मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्याची सल माझ्यावर आरोप करून पूर्ण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. अमानवीय कृत्याचे राजकारण करून या प्रकरणाचे गांभिर्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाशिक शहरातील राजकारण किती हीन पातळीला जाऊन पोहोचले याचे हे उदाहरण असल्याचे फरांदे यांनी सांगितले. खोटी माहीती पसरून आपल्या बदनामीचे षडयंत्र रचणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दरी-मातोरी प्रकरणातील संशयित निखील पवारला आपल्या घरातून अटक झालेली नाही, असा दावाही त्यांनी केला. या प्रकरणातील मुख्य संशयित संदेश काजळेला अटक करावी, अशी मागणी फरांदे यांनी केली.