जळगाव : शहरातील १३ महिलांना भिशीचे आमिष दाखवत एका दाम्पत्याने तब्बल ५५ लाख २२ हजार २८० रुपयांना गंडवल्याची घटना उघड झाली आहे. भिशीसाठी पैसे गोळा करण्यासह सासर्‍याच्या उपचारासाठी पैसे उसनवार घेऊन दाम्पत्याने १३ महिलांची फसवणूक केली. सविता संजय सोळंखे व तिचा पती संजय धोंडू सोळंखे अशी संशयित दाम्पत्याची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी ठोसर या शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील योजनानगरात वास्तव्यास आहेत. त्याच भागातील सविता सोळंखे आणि संजय सोळंखे या दाम्पत्याशी पल्लवी यांची दीड वर्षापूर्वी परिचय झाला. सविताने खासगी भिशी सुरू केली. त्यात परिसरातील महिलांनाही आमिष दाखविले. सप्टेंबरमध्ये सविताने पैसे वाढवून देण्याचे आमिष दाखवून पल्लवीकडून ५० हजार रुपये घेतले. नंतर हळूहळू काही रक्कम देऊन पल्लवी यांचा विश्‍वास संपादन केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नंदुरबारमध्ये डुकरांना आफ्रिकन स्वाइन फिवर, आजपासून कलिंग प्रक्रिया

योजनानगरातील इतर महिलांकडून दर महिन्याला खासगी भिशीच्या नावाने सविता ही रक्कम गोळा करत असल्याची माहितीही पल्लवी यांना मिळाली. नंतर सविताने काही महिलांच्या नावावर वैयक्तिक कर्ज काढले. सोळंखे दाम्पत्याने पल्लवी यांना जादा पैसे परत करण्याचे आमिष दाखवून १३ लाख ४६ हजार २०० रुपये घेतले. तसेच काही महिलांकडूनही सुमारे ४१ लाख ७६ हजार ८० रुपये जमा केले. काही दिवसांनी पल्लवी यांनी सविताला पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पैशांसाठी पल्लवी यांनी सविताच्या घरी चकरा मारल्या. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर आपल्यासह इतर महिलांची फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पल्लवी यांनी थेट जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून सविता सोळंखे व तिचा पती संजय सोळंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अनंत अहिरे तपास करीत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon 13 woman cheated with the lure of bhishi for rupees 55 lakhs by a couple css
Show comments