शासकीय कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन; बाजार समित्यांमधील १५० कोटींची उलाढाल ठप्प

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या सहाव्या दिवशी म्हणजे मंगळवारीही शेतमाल न आल्यामुळे जिल्ह्यतील बाजार समित्यांचे कामकाज बंद राहिले. आतापर्यंत या समित्यांमधील तब्बल दीडशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांना टाळे ठोकत शांततापूर्ण मार्गाने आंदोलने केली.

किसान क्रांतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर मंगळवारी भाजीपाला व दूध यांचा पुरवठा सुरळीत होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. तथापि, प्रत्यक्षात तसे घडले नाही. शहरात ठिकठिकाणी भरणारे अनेक भाजी बाजार संपामुळे बंद आहेत. त्यामुळे चार ते पाच दिवस डाळी व तत्सम वस्तुंचा आधार घेणाऱ्या गृहिणी त्रस्तावल्या आहेत. ज्या ठिकाणी भाजीपाला उपलब्ध असतो, तिथे कमालीची दरवाढ झाली. भाजीपाल्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजार समितीत होते. सहाव्या दिवशी या ठिकाणी एकही भाजीपाल्याची गाडी आली नाही.  अशी स्थिती जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत व अन्य बाजार समित्यांची आहे. लासलगाव बाजारात कांद्याची आवक बंद आहे. शहरातील सरकारी दूध विक्री केंद्रावर दूध मिळत नसल्याची तक्रार झाली. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दुग्ध व्यवसाय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला.

मागील पाच दिवसांत ग्रामीण भागात झालेली आक्रमक आंदोलने मंगळवारी शांततेच्या पध्दतीने झाली. शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला गेला होता. त्यानुसार काही ठिकाणी तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. नांदगावच्या जातेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. दिंडोरी येथे तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले. मालेगाव व देवळा येथे शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शांतता असून वाहतूक सुरळीत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. कळवण तालुक्यातून टोमॅटो १३ मालमोटार, कांदे १२, मिरची ३, भेंडी २ हा माल पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आला. दुधाचा एकही टँकर मात्र गेला नाही. आंदोलकांनी ग्रामपंचायतींना टाळे ठोकल्याची जी छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल केली, त्यातील चांदवडमधील रायपूर ग्रामपंचायतीचे कार्यालय जुने असून ते आधीपासून कुलूपबंद आहे. त्याचे छायाचित्र काढून टाळे ठोकल्याचा संदेश व्हायरल केला गेल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या दिवशी जिल्ह्यात शांतता असून एखादा अपवाद वगळता कुठेही रास्तारोको झाला नाही. यामुळे दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत.

आंदोलन दडपण्याचा आरोप

गावात आंदोलनासाठी पुढाकार घेणाऱ्या वा सहभागी झालेल्यांची शोध मोहीम पोलिसांनी हाती घेतल्याचे किसान क्रांतीच्या सुकाणू समितीचे सदस्य राजू देसले यांनी सांगितले. पोलीस पाटलाच्या मदतीने अशा शेतकऱ्यांना नोटीस बजावली जात आहे. आंदोलनापासून दूर करण्यासाठी शेतकरी वर्गावर दडपशाहीचा मार्ग पोलिसांनी अवलंबिल्याचा आरोप देसले यांनी केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर अंबर दिवा

देशातील मंत्री, सचिव व तत्सम महत्त्वाच्या पदांवरील अधिकारी वर्गाच्या वाहनांवरील अंबर दिवे काढून टाकण्याचा निर्णय झाल्यानंतर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे अनुकरण केले होते. परंतु, महिनाभरात जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर पुन्हा अंबर दिवा बसविला गेला आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात सध्या तीव्र स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे काही दिवस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या कालावधीत जिल्ह्यात भ्रमंती करताना यंत्रणेला अन्य वाहने आणि जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन यात फरक करणे अवघड ठरते. तसेच दिव्याचे वाहन असल्यास वेगळा प्रभाव पडत असतो. अशा काही बाबी विचारात घेऊन हा दिवा बसविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाकडे संपर्क साधला असता त्यांनी आता पोलीस व अग्निशमन दल वगळता कोणालाही दिवा बसविण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. यापूर्वी ज्या अधिकारी वा व्यक्तींच्या वाहनांना दिवा बसविण्यास परवानगी होती, त्यांना स्टिकर दिले जात असे. आता ती पद्धतही बंद झाली. जिल्हाधिकारी हे दंडाधिकारी असतात. त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांच्या वाहनावर हा दिवा लावला गेला असावा, असा अंदाज प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

जावडेकर यांना साकडे

शेतकऱ्यांनी चालविलेला संप, समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांवर ओढावलेले संकट आणि ईपीएफ ९५ पेन्शनधारकांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, या मागणीसाठी शेतकरी, इपीएफ पेन्शनर्स फेडरेशन यांच्यातर्फे नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनुष्यबळ विकास विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना साकडे घालण्यात आले. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, कृषिमालास उत्पन्नावर आधारीत भाव द्यावा, समृद्धी महामार्ग रद्द करून शेतजमिनी वाचवाव्यात, अशी मागणी सुकाणू समितीचे सदस्य राजू देसले यांनी जावडेकर यांच्याकडे केली. त्यांना गुलाबपुष्प देऊन शेतकऱ्यांनी गांधीगिरी केली. केंद्रात महाराष्ट्रातील महत्त्वाचे मंत्री म्हणून आपण कार्यरत आहात. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.