नाशिकमध्ये वातावरणनिर्मिती

नाशिक : महाजनादेश यात्रेच्या समारोपात जोरदार शक्तिप्रदर्शन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा या माध्यमातून भाजपने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यासाठी उत्तर महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असणाऱ्या नाशिकची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली. मोदी यांनी सभेत ‘प्रभू रामचंद्र, सीतामातेच्या चरणस्पर्शाने पावन आणि सप्तश्रुंगी मातेच्या निवासाने पवित्र नाशिकच्या कर्मभूमीला नमन..’ अशी मराठीतून साद घालत उपस्थितांना चकित केले. विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. अपेक्षित वातावरण निर्मिती झाल्यामुळे भाजपच्या आशा उंचावल्या आहेत.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती विधानसभा निवडणुकीत फिस्कटली होती. त्यावेळी विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांची नाशिकमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी पुन्हा पंतप्रधानांची नाशिक येथे सभा घेण्यामागे भाजपने अधिकाधिक राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचा उद्देश ठेवला आहे. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’ झाला. भरपावसात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जाहीर सभेवर पावसाचे सावट असतानाही शहर-ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणावर जनसमुदाय लोटला. या गर्दीचे पंतप्रधानांनी ‘कुंभमेळ्याच्या भूमीत लोकशाहीतील कुंभाचा हा परिचय’ असे वर्णन केले.

नाशिकला लष्करी सामग्री उत्पादनाचे केंद्र (डिफेन्स इनोव्हेशन हब) विकसित केले जात आहे. देशात चार ठिकाणी ‘लॉजिस्टिक हब’ होणार आहे. त्यातील एक हब नाशिकमध्ये असेल. रामायण सर्किट अंतर्गत नाशिकचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. शिवाय, सागरमाला योजनेतून महामार्गाची कामे प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पांची माहिती देत मोदी यांनी नाशिकचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्मार्ट सिटी अंतर्गत चाललेली विविध कामे, मेट्रो रेल्वे आदींचे दाखले दिले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ दणक्यात झाल्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती होईल की नाही, याबद्दल भाष्य करणे सर्वानीच टाळले. नाशिकचा विचार करता सद्य:स्थितीत १५ पैकी चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. यामध्ये नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि चांदवड यांचा समावेश आहे. भाजपच्या शहरातील काही मतदारसंघांवर शिवसेनेचा डोळा आहे. शहरी भागातील वर्चस्वामुळे भाजपला महापालिकेची सत्ता काबीज करणे शक्य झाले. सेनेला नाशिक पश्चिम मतदारसंघ हवा आहे. युती झाल्यास भाजपच्या ताब्यात असणारी एकही जागा दिली जाणार नसल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आधीच सांगितले आहे. शिवसेनेकडे देवळाली, मालेगाव बाह्य़, निफाड, सिन्नर हे मतदारसंघ आहेत. इगतपुरीत काँग्रेसच्या महिला आमदारांनी शिवबंधन बांधले आहे. येवला, नांदगाव, दिंडोरी, बागलाण हे राष्ट्रवादीकडे, तर मालेगाव मध्य काँग्रेस आणि कळवण मतदारसंघ माकपच्या ताब्यात आहे. गेल्यावेळी स्वतंत्रपणे लढताना नांदगाव मतदारसंघात सेना-भाजपच्या पराभूत उमेदवारांमध्ये फारसे अंतर नव्हते. या मतदारसंघावर दोन्ही पक्ष दावा सांगत आहेत.

इच्छुकांची संख्या मोठी :

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. मध्यंतरी सर्व १५ मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. युतीबाबत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वाचे लक्ष आहे. सध्या ताब्यात असणारे मतदारसंघ राखून विरोधकांचे मतदारसंघ खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी महाजनादेश यात्रा, मोदी यांची सभा आणि प्रचाराचा शुभारंभ यातून बळ मिळाले आहे.