शहरातील महाविद्यालयांसमोर देणगी मागितल्यास ‘कोपऱ्यापासून ढोपऱ्यापर्यंत सोलून काढू’असे आक्षेपार्ह फलक लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी मनसेचा मनविसेचा शहराध्यक्ष तुषार मटाले आणि जिल्हाध्यक्ष गणेश मोरे यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रस्त्यावरील भोसला महाविद्यालयासमोर उभारलेला हा फलक पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या फलकांबाबत संबंधित यंत्रणांची परवानगी घेतली आहे काय, याची चौकशी करण्याची सूचना गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे यांना केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी केली असता महापालिका व पोलिसांची परवानगी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे वादग्रस्त फलक जप्त करण्यात आले.

मनविसेचे शहराध्यक्ष तुषार मटाले आणि जिल्हाध्यक्ष गणेश मोरे यांनी हे फलक उभारले होते. महापालिका व पोलीस तसेच इतर कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी न घेता सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यात आले. त्यामुळे अनधिकृत फलक लावल्यावरून संबंधितांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, स्वस्तात प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात शहरभर उभारल्या जाणाऱ्या फलकांनी विद्रुपीकरण होते, शिवाय अनेकदा वाहनधारकांसाठी ते अडचणीचे ठरतात. फलक लावण्यावरून झालेल्या वादातून खून झाल्याची उदाहरणे आहेत. राजकीय नेत्यांचे वाढदिवस फलकांद्वारे साजरे होतात. पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या शुभेच्छांचे फलक गल्लोगल्ली दृष्टिपथास पडतात. सार्वजनिक ठिकाणी फलक उभारण्यासाठी यंत्रणांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, नियम व कायदा जणू आपल्याला लागू नाही असा राजकीय पदाधिकाऱ्यांचा आविर्भाव असतो. अनधिकृत फलकबाजीबाबत महापालिकेने आजवर बोटचेपी भूमिका घेत असल्याने राजकीय कार्यकर्त्यांना मोकळे रान मिळाल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. या स्थितीत पोलिसांनी गुन्हा दाखल करत अनधिकृत फलक उभारणीला लगाम घालण्याचा प्रयत्न चालविला आहे.