जळगाव : जळगावात दुचाकींची चोरी करुन त्यांची विक्री करण्यासाठी मात्र थेट मध्य प्रदेश गाठायचे, अशी शक्कल लढविणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात जळगाव येथील एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. त्यासाठी त्यांना थेट मध्य प्रदेशातील खंडवा गाठावे लागले. कमी किमतीत दुचाकींची विक्री करणार्‍या टोळीचे जाळे यानिमित्ताने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने उदध्वस्त केले. संशयितांकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील खंडवा येथील एकजण कामानिमित्त जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होता. शहरातील विविध भागांतून तो दुचाकी चोरुन मध्य प्रदेशातील पिपलोद येथे त्या कमी किमतीत आपल्या साथीदारांच्या मदतीने विक्री करीत होता. संशयिताने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, गफूर तडवी, सुनील सोनार, विकास सातदिवे, योगेश बारी, छगन तायडे यांचे पथक तयार करून कारवाईसाठी खंडवा येथे पाठविले. तेथून पथकाने अनोप कलम (१८, रा. सुकवी, खंडवा, मध्य प्रदेश) आणि अंकित ठाकूर (२२, रा. मुसाखेडी, इंदूर, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा…धुळ्यातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात फलकबाजी

संशयितांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे पोलिसांनी दंडुका दाखविताच संशयितांनी सहा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने दोघांकडून जळगावातून चोरी केलेल्या सहा दुचाकी हस्तगत केल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.