मनमाड : मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह वादळी पावसाने दमदार सलामी दिली. पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्यासह काही घरांचे पत्रेही उडाले. हे नुकसान झाले असले तरी उकाडय़ाने हैराण झालेल्या मनमाडकरांनी पावसाचे स्वागत केले. पावसामुळे तापमानातही घसरण झाली.

 हवामान विभागाने पावसाचे वेळेवर आगमन होईल असा अंदाज दिला असला तरी जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत जिल्ह्यास पावसाची प्रतीक्षा होती. पाणीटंचाईचे संकट गंभीर स्वरूप धारण करीत असताना दुसरीकडे उकाडय़ात कमालीची वाढ झाली. त्यामुळे सर्वाचे लक्ष पावसाच्या आगमनाकडे होते. बुधवारपासून मृग नक्षत्राने पावसाळय़ाला अधिकृत प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तडाखेबंद पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयालगत असलेल्या कै. सौ. सुशीलाबाई बागरेचा प्राथमिक शाळेच्या वर्गावरील पत्रे उडून ते भररस्त्यात आडवे पडले. वादळी वाऱ्याने

अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने आगामी काळात दमदार पाऊस होऊन शेतशिवार हिरवेगार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अंग भाजून काढणाऱ्या तीव्र तापमानामुळे मनमाडकर अक्षरश: अस्वस्थ झाले होते. त्यामुळे कधी एकदा पावसाचे आगमन होते आणि जोरदार पाऊस पडतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. शहर परिसरात मार्च महिन्यापासून तापमानाचा पारा कमालीचा वाढू लागला होता. सुरुवातीला ३६ अंशांवर असलेले तापमान यंदा मे महिन्यात ४२ अंशांवर स्थिर होते. त्यामुळे तीव्र उन्हाने नागरिकांना हैराण केले. तीन दिवसांपासून तापमानाचा पारा कमालीचा वाढला. बुधवारी सकाळी तापमान ३९ अंशांवर होते. दुपारी तीनच्या सुमारास आभाळ भरून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह साडेतीन वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा वेग प्रचंड होता. समोरचे काही दिसत नव्हते. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे बागरेचा शाळेवरील पत्रे उडून ते भर रस्त्यात पडले. सायंकाळी उशिरापर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा धुमाकूळ सुरू होता. वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.