लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : जनावरांपेक्षाही वाईट असे आमचे जगणे झाले आहे. सकाळी पहिले पाणी कुठून आणि कसे मिळेल ते पाहायचे, मग स्वयंपाक आणि बाकी काम. कधी कधी संपूर्ण दिवसच पाण्यासाठी थांबावे लागते, पाण्यासाठीच दिवस घालवला तर मजुरीचे काय ? कामावर न गेल्यास खाणार काय…

त्र्यंबकेश्वर शहरापासून ३० किलामीटर अंतरावर असलेल्या बोरपाडा गावातील महिलांची ही अगतिकता सर्वकाही सांगून जाते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उन्हाळा सुरु होताच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागाला नकोसे होते. दरवर्षी उन्हाळ्यात महिलांना एकेक,दोनेक किलोमीटर पायपीट करून हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पाणी मिळवण्यासाठी पायपीट नित्याची आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वदूर भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

आणखी वाचा-दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरपाडा गावात अशीच काहीशी परिस्थिती असून सकाळी उठल्यापासून दोन हंडे डोक्यावर घेऊन महिला नदीवर जातात. नदीच्या कडेला असलेल्या झिऱ्यातून हंडा भरण्यासाठी बराचवेळ थांबावे लागते.रपाडा ही शंभर ते दोनशे लोकांची वस्ती असून दरवर्षीं प्रमाणे यंदाही या पाड्यावर भीषण टंचाई जाणवू लागली आहे. नेहमीच्या टंचाईमुळे महिला अक्षरशः हतबल झाल्या असून कधी, कुठून, कसे पाणी आणता येईल, हाच विचार सारखा त्यांच्या डोक्यात घोळत असतो. देवकाबाई म्हणतात, ”सकाळी उठल्यावर पहिले पाण्याचे काम करावे लागते. दरवर्षीं आमच्या नशिबी पाण्यासाठी वणवण आहेच, कधी थांबणार हे ? ज्या विहिरीला पाणी होते, ती आटली. आता थेट झिऱ्यावर जाऊन पाणी आणावे लागते, ते सोपे नाही. अख्खा दिवस निघून जातो, असे सांगतांना देवकाबाई यांनी दिनक्रम मांडला.

उन्हाळ्यात सकाळी पाच वाजता उठायचे, डोक्यावर हंडे घेऊन झिऱ्याकडचा रस्ता धरायचा. झिऱ्यात पाणी आहे की नाही बघायचे. तासभर वाट पाहिल्यानंतर झिऱ्यात पाणी झिरपून येत असते. त्यानंतर ते पाणी बरोबर आणलेल्या गाळणीने गाळून घरी घेऊन जायचे, असा हा ठरलेला दिनक्रम. सुमनबाई यांनीही अशीच परिस्थिती मांडली. आमचे लग्न झाले तेव्हापासून आम्ही हेच करतोय. कुठे जाणे नाही, येणे नाही. कधी थांबायचं हे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या गावातून मुली लग्न करून दुसरीकडे जातात. पण, गावातल्या मुलांना कुणी मुलगी देईना, अशी स्थिती झाली आहे. तुमच्या गावात पाणी नाही, मुलगी कशी देणार ? गावात पाणी आणा, मग पाहू, असं सांगत बोळवण होते. गावातल्या बायांनी अनेक वेळा पाण्यासाठी भांडण केले. परंतु, कोणीच मनावर घेत नाही. मग करावे तरी काय, असा त्यांचा प्रश्न समोरच्याला निरूत्तर करून जातो.

आणखी वाचा-नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट

महिलांची जीवघेणी कसरत

त्र्यंबकेश्वर-हरसुल रस्त्यावरील वेळुंजे गावापासून घाटातून नांदगाव कोहळी गावाकडे गेल्यावर उजव्या बाजूच्या रस्त्याने वैतागवाडी गावावरून आपण वारसविहीर गावापर्यत पोहचतो. याच गावाच्या ग्रुप ग्रामपंचायतीपैकी बोरपाडा हे गाव आहे. वारसविहीर गाव ओलांडल्यानंतर लागलीच बोरपाडा सुरू होतो. कधी सकाळच्या सुमारास तर कधी सायंकाळी तर कधी रात्री देखील येथील महिलांना पाण्यासाठी झिऱ्यावर जावे लागते. गावापासून एक किलोमीटरवरील दरीत नदी आहे, या नदीच्या पोटाला हा झिरा आहे. यासाठी महिलांना खाली उतरावे लागे लागते. पाणी घेऊन येताना चढ चढावा लागतो. जिथे पाणी आहे, तो पाच फुटांचा झिरा भरण्यास काही वेळ लागतो. पुन्हा हंडा भरायचा म्हटला की, अर्धा ते पाऊण तास निघून जातो. एकाचवेळी १५ ते २० हंडे झिऱ्यावर येत असतात. अशावेळी दोन ते अडीच तास थांबून पाणी भरावे लागते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Struggle of women in borpada village of trimbakeshwar taluka for water mrj
Show comments