लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सहा लाख ६४ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा आणि मद्याची होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे.

आणखी वाचा-नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट

सोमवारी रात्री दिंडोरी येथे पेठ-गुजरात महामार्गावरील रासेगाव फाटा परिसरात काही संशयित चारचाकी वाहनातून गुटख्याची विक्री करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार रासेगाव शिवारात पोलिसांनी सापळा रचला. संशयित वाहन अडवून तपासणी केली. आसिफ पठाण (२६, रा. नाशिक) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सहा लाख ६४ हजार ५३० रुपयांचा गुटखा तसेच वाहन असा एकूण १४ लाख, ६४ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुटखा किंवा तत्सम सुंगधित सुपारी याचा पुरवठा करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. संशयितांवर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.