नाशिक : शहरातील जुने मध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस) ते कॅनडा कॉर्नर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक नियंत्रणासाठी परिसरातील आठ मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम १८ महिन्यात टप्प्याटप्प्याने होणार आहे. एकेरी मार्गाच्या रस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक बंद करणे आवश्यक आहे. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. या काळात वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

महापालिकेकडून सीबीएस ते कॅनडा कॉर्नर चौकदरम्यानच्या १३०० मीटर लांब रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना प्रसिध्द केली आहे. कॅनडा कॉर्नर, त्यापुढील अन्य रस्त्यांवरून सीबीएसकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. यात कॅनडा कॉर्नर सिग्नल, शासकीय रुग्णालय, ठक्कर बाजारकडून किशोर सुधारालय, मेळा स्थानकमार्गे सीबीएसकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. जलतरण तलाव सिग्नलकडून रामायण बंगला, टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडे येणाऱ्या वाहतुकीला प्रतिबंध असणार आहे. राका कॉलनी, लेले रुग्णालय, कुलकर्णी गार्डनकडून तसेच ठक्कर नगरकडून कुलकर्णी गार्डनमार्गे सीबीएसकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद राहील. नवीन पंडित कॉलनीकडून सुश्रुत रुग्णालय राका गार्डनमार्गे सीबीएस, जुनी पंडित कॉलनी लेन क्रमांक एक, दोन, तीन, माधवबाग क्लिनिक, काबरा एम्पोरियम, टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीला प्रवेश बंद असणार आहे.

हेही वाचा…खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ

सीबीएस ते कॅनडा कॉर्नर सिग्नलपर्यंतच्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूला १०० मीटरपर्यंत १८ महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या वाहनांकरिता ना वाहनतळ क्षेत्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवाव्यात. अपघात होऊ नये म्हणून दिवसा व मुख्यत्वे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना दिसेल असे प्रवेश बंद, काम चालूचे फलक लावण्याची सूचना वाहतूक पोलिसांनी केली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्यास संबंधित विभाग, ठेकेदार जबाबदार राहील, असा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा…नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

पर्यायी मार्ग कोणते ?

कॅनडा कॉर्नर सिग्नलकडून शरणपूर रस्त्याने सीबीएसकडे जाणारी वाहतूक कॅनडा कॉर्नरमार्गे जुना गंगापूर नाका, मॅरेथॉन चौक, अशोकस्तंभ मार्गे इतरत्र जाईल. अथवा कॅनडा कॉर्नर ते एचडीएफसी सिग्नल, जुना सीबीटी सिग्नल, मायका चौक, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल (त्र्यंबक नाका) मार्गे इतरत्र जातील. कॅनडा कॉर्नर सिग्नलकडून शरणपूर रस्त्याने सीबीएसकडे जाणारी वाहतूक कॅनडा कॉर्नर ते एचडीएफसी सिग्नल, जुना सीबीटी सिग्नल, मायको चौक, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल (त्र्यंबक नाका) मार्गे इतरत्र जातील. सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नरकडे टिळकवाडी सिग्नलमार्गे जाणारी वाहतूक एकेरी केली जात आहे. ही वाहतूक रस्त्याच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कामानुसार सीबीएस ते कॅनडा कॉर्नर अशी एकरी सुरू राहील.