जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच भाजपमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली असताना, शिंदे गटाला साथ देणारे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मात्र धाकधूक वाढली आहे. विधानसभेला मुक्ताईनगरमधून खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या उमेदवारी करण्याची शक्यता असल्याने पाटील यांची अडचण होऊ शकते. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव गाठत पाटील यांची समजूत काढल्याचे सांगितले जाते. भाजप नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हेही या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने भाजपचे नाराज खासदार उन्मेष पाटील, पारोळय़ाचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना पक्षात घेत पवार यांची जळगावमधून उमेदवारीही जाहीर केल्यानंतर रावेरसाठी तोच कित्ता गिरवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. रावेरमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपच्या युवानेत्यास पक्षात घेण्याचे प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरू असताना  या धामधुमीत एकनाथ खडसे हे पुढील आठवडय़ात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

हेही वाचा >>>महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी

 खडसे हे भाजपमध्ये आल्यास चार वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात संपर्क साधून असलेल्या अ‍ॅड. रोहिणी खडसे या लेकीसाठी दावा करण्याची शक्यता आहे. आमदार पाटील यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी जळगावात दाखल झाले. त्यांच्यासमवेत पक्षप्रतोद भरत गोगावले हेही होते. शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून जळगाव आणि रावेर या मतदारसंघांतील सद्य:स्थिती जाणून घेतली. रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्याविरोधात नाराज असलेले आमदार पाटील यांनाही मंत्री महाजन यांनी तात्काळ जळगावात बोलावून घेतले. आमदार पाटील यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी, मी आहे ना, काळजी करू नका, असा दिलासा दिला.एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येत असल्याने शिंदे गटाला साथ देणारे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची धाकधूक वाढली आहे.

मंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित असल्याने मी वैयक्तिकरीत्या चर्चा करू शकलो नाही. चंदू, तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे, या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी मला काही बाबींसाठी दिलासा दिला. रविवारी मुंबईत शिंदे यांची पुन्हा भेट घेणार आहे.  – चंद्रकांत पाटील ,(आमदार, मुक्ताईनगर)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla chandrakanat patil is upset as eknath khadse will return to bjp amy
First published on: 07-04-2024 at 04:48 IST