लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : लासलगाव येथे खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींना प्रश्नपत्रिका दाखविण्याचे आमिष दाखवून विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन विनयभंग आणि पोस्को अंतर्गत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा-वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

लासलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील खासगी शिकवणी वर्गात संशयितांनी विद्यार्थिनींना आमिष दाखवून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे नुमान शेख (रा. टाकळी विंचुर, निफाड), सुमित भडांगे (रा. गणेश नगर, लासलगाव) यांचेविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी शिकवणीवर्ग चालकांविषयी पालक अगर विद्यार्थिनी यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी लासलगाव पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले आहे.