मतदान शांततेत; गुरुवारी निकाल

अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या भाजपच्या खेळीने पक्षांतर्गत माजलेली दुफळी, त्याचा लाभ घेण्यासाठी शिवसेनेने केलेली धडपड, मराठा-वंजारी अशा जातीय समीकरणाच्या आधारे मत विभागणीचा प्रयत्न आदी राजकीय पटलावरील घडामोडींनंतर अखेर विधान परिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. अखेरच्या टप्प्यातही फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घडामोडीचा गुरुवारी निकाल लागणार आहे.

भाजपने अपक्ष उमेदवाराऐवजी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने ही लढत दुरंगीच झाली. पक्षांतर्गत निर्णय, जातीय समीकरणे आणि लक्ष्मीदर्शन यामुळे प्रत्येक पक्षाची मते फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपलाच विजय होणार असल्याचा तसेच घोडेबाजार झाला नसल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेचे नरेंद्र दराडे, काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष परवेझ कोकणी यांच्यातील तिरंगी लढतीत भाजपच्या निर्णयाने वेगवेगळे परिणाम झाले. मित्रपक्ष शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्यासाठी भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीला उघडपणे पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार स्पर्धेतून बाजूला झाला. पक्षीय निर्णयाचे किती सदस्य पालन करतात, हा भाजपसमोरील प्रश्न आहे. भाजपच्या संदिग्ध भूमिकेमुळे सेना, राष्ट्रवादीने आधीपासून त्यांच्या सदस्यांना आपलेसे करण्याची धडपड चालविली होती. अखेरच्या टप्प्यात मतदारांना आकृष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली गेली नाही. एकेका मतासाठी लाखो रुपयांची बोली लावली गेल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर, भाजपसह सर्वपक्षीय मतांमध्ये फूट पाडण्यासाठी जातीय समीकरणाचा आधार घेतला गेला. निवडणुकीला मराठा विरुद्ध वंजारी असे स्वरूप अखेरच्या टप्प्यात प्राप्त झाल्याचे पाहावयास मिळाले.

कोणत्याही पक्षाकडे आवश्यक पहिल्या पसंतीची मते मिळतील इतके संख्याबळ नसल्याने उमेदवारांनी विरोधकांचे सदस्य गळाला लावण्याचे निकराने प्रयत्न केले. सेना-भाजपमधील भांडणात ऐनवेळी भाजपचा पाठिंबा मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. सेनेने भाजपचे मते खेचण्यासाठी निकराचे प्रयत्न केले.

पक्षीय बलाबलाचा विचार करता शिवसेनेचे २०७, काँग्रेस आघाडी १७१, भाजप (मित्रपक्ष) १७८, माकप १३ आणि इतर छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून ७५ मतदार आहेत. मतदानात मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार झाल्याची चर्चा आहे. पण सेना आणि राष्ट्रवादीने ती बाब नाकारली. निवडणुकीला जातीय रंग चढला नसल्याचे संबंधित उमेदवार, नेत्यांकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकून पाठबळ दिले. भाजपने आपणास पाठिंबा दिल्यामुळे विजय निश्चित झाला आहे. निवडणुकीत घोडेबाजार झाल्याच्या निव्वळ अफवा आहेत.  सर्व मतदार जागरूक आहेत, असे काँग्रेस आघाडी उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी सांगितले.

घोडेबाजार, जातीय रंग नाही

भाजपने राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला असला तरी या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विक्रमी मतांनी निवडून येणार आहे. शिवसेनेने सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. त्यानुसार नाशिक विधान परिषदेची निवडणूक लढविण्यात आली. या निवडणुकीत घोडे बाजार झाल्याचे वाटत नाही. निवडणुकीला जातीय रंग देखील चढलेला नाही.

भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, शिवसेना

भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याची सूचना केली. वरिष्ठांचा निर्णय भाजपच्या सर्व सदस्यांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. सर्व सदस्यांना तोंडी सूचना करण्यात आल्या. पक्षादेश बजावण्यात आला नाही. भाजपचे सदस्य एकसंध आहेत. मतांची फाटाफूट होणार नाही. वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे सर्व जण पालन करतील.

आ. बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप