लोकसहभागातून कायमस्वरूपी योजना
समाज माध्यमाचा विधायक कामांसाठी वापर करण्याचा प्रयत्न येथील सोशल नेटवर्किंग फोरम या सामाजिक संस्थेकडून सुरू आहे. पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत संस्था १५ डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात लोकसहभागातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना प्रकल्प सुरू करत आहे. टंचाईग्रस्त तोरंगण गावाचा पाणीप्रश्न या माध्यमातून काही अंशी सुटणार असून अनेक सामाजिक उपक्रमांची पायाभरणी संस्थेच्या माध्यमातून होत आहे.
फोरमने जिल्हा, राज्य तसेच देशाची सीमा ओलांडत आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. सामाजिक माध्यमातून निधी संकलित करत संस्था त्यातून सामाजिक उपक्रमांची आखणी करणे, तरुणांना सामाजिक उपक्रमांसाठी प्रोत्साहित करणे, वंचितांना सहकार्याचा हात देणे या उद्देशाने काम करत आहे. संस्थेने वर्धापन दिनाचे औचित्य साधत अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वात भीषण पाणीटंचाई असणारे गाव म्हणजे ‘तोरंगण’. दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले हे गाव. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. गावातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन संस्थेने गावातील राहुल बोरसे या तरुणाच्या सहकार्याने या उपक्रमाची संकल्पना मांडली. यासाठी डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, डॉ. प्रशांत देवरे, मितेश मुथा यांच्या सहकार्याने भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. जयदीप निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा योजनेचा प्रकल्प यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फोरमने फेसबुकवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक तरुणांनी आणि डॉ. भदाणे यांच्या प्रयत्नांनी निधी संकलित करण्यात आला आहे. तोरंगण गावचा पाणीप्रश्न मार्गी लागल्यानंतर फोरमचा इतर काही गावांतील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा मानस असल्याची माहिती संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी दिली.
या संस्थेने वर्षभरात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यात सात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, मराठवाडय़ातील दुष्काळात बीडलगतच्या राजपिंपरी गाव आणि अभयारण्यातील प्राण्यांना पाण्याच्या टाकीची उपलब्धता करण्यात आली. अभियानात सहभागी सदस्य वाढदिवस साजरा न करता त्यातून वाचणारा पैसा हा अनाथालय किंवा वृद्धाश्रमात जीवनोपयोगी साहित्य देण्यासाठी वापरतात. आदिवासी आणि ग्रामीण भागातील शाळांना पुस्तके, खेळाचे साहित्य भेट देण्यात आले आहेत. टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संभाषण व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम आणि रोजगारनिर्मिती केली. आदिवासी बांधवांना मोफत कायदा सल्ला मिळावा यासाठी वकिलांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शरीरावरील व्यंग दुरुस्ती, कृत्रिम हातांचे रोपण, गरिबांना वैद्यकीय सुविधा असे उपक्रम फोरम राबवीत आहे. युवकांच्या मदतीने नियमित स्वच्छता अभियानही राबविण्यात येते.