ऐरोली येथील पटनी कंपनीनजीक ठाण्याकडून ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील वळणानजीक भलामोठा खड्डा पडला आहे. आमदार संदीप नाईक यांनी पाहणी दौरा करून हा खड्डा बुजवण्याचे एमआयडीसीला सूचित केले होते. मात्र त्यानंतरही हा खड्डा बुजवण्यात आला नाही. तब्बल दीड महिन्यांनतर सात दिवसांपूर्वी (१३ सप्टेंबर ) जनसंवाद या उपक्रमांतर्गत झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी या खड्डय़ाची समस्या पुनश्च मांडली होती. मात्र सात दिवस उलटूनही या खड्डय़ाची दुरुस्ती करण्यात आली नाही. काही संघटना पटनी मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी लवकरच रस्त्यावर उतरणार आहेत.
पटनी कंपनी रस्त्यावर ठाणे आणि मुंबईकडे दिवसागणिक ५ ते ६ हजार वाहनांची वर्दळ होते. या मार्गावर सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पथदिवे रात्रीच्या वेळेला बंद असून पादचारी मार्गावरील गटाराची झाकणे गायब झाली आहेत. तर रस्त्याच्या मधोमध भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आमदार संदीप नाईक यांनी या प्रभागाचा दौरा केला होता. यावेळी उपस्थित एमआयडीसीच्या अधिकांऱ्याना खड्डे बुजवण्याचे आणि पथदिवे सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र या दुरवस्थेत बदल झाला नाही. याबाबत एमआयडीसीचे उपअभियंता ए. व्ही. उमरेगर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.