पनवेलमध्ये आयुक्तांच्या दालनाबाहेर भाजपचे आंदोलन; कामकाज बेशिस्त असल्याचा आरोप

पनवेल : महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असली पालिका प्रशासनाचे कामकाज बेशिस्त असल्याचा आरोप करत वेळोवेळी सत्ताधाऱ्यांनाच आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. उपमहापौरांसह सभागृह नेते या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. महापालिकेचे कामकाज योग्य होत नसेल तर त्यांना वठणीवर आणण्याचे काम विरोधी पक्षांचे. मात्र पनवेल महापालिकेत सत्ताधाऱ्यांवरच विरोधी पक्षांप्रमाणे आंदोलन करण्याची वेळ आली.

पनवेल महापालिकेमध्ये सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा नवा वाद सुरू झाला आहे. यापूर्वी सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटाकडून अधिकारी खोटी माहिती देणे, वेळेवर उत्तर न देणे, सभेने दिलेल्या सूचनांची पूर्तता न करणे असे आरोप अधिकाऱ्यांवर झालेले आहेत. पालिका आयुक्तांनी या सर्व आरोपांची गंभीर दखल घेत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या व इतर बदल कामकाजात केले होते. मात्र त्याचा काही लाभ न झाल्याने सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारी दुपारच्या सत्रात पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांच्यात पालिकेमध्ये बैठक होती. ही बैठक अधिकाऱ्यांनी वेळेवर सुरू केली नसल्याने उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यानंतर कोळीवाड्यातील मासेबाजार स्वच्छतेची दुसरी बैठक सुरू झाली. या बैठकीत साहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव हे विलंबाने उपस्थित झाले. जाधव यांना मासेबाजाराच्या स्वच्छतेविषयी विचारणा केल्यानंतर त्यांनी अशी कोणतीही समस्या नसल्याचे बैठकीत सांगितले. त्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत तेथील सद्यस्थितीचे छायाचित्र बैठकीत दाखविले. खोटी माहिती देऊन साहाय्यक आयुक्तांसह अधिकारी वेळ मारून नेत असल्याचे उजेडात आल्यावर संतापलेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. मात्र संतापलेल्या पदाधिकाऱ्यांनी आधी साहाय्यक आयुक्त जाधव यांच्यावर २४ तासांत कारवाई करा, असा हट्ट धरला.

‘ते असे का वागतात?’

पालिकेमध्ये एकहाती सत्ता असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आणि पालिका आयुक्तांचे पटत नाही. यापूर्वी प्रभाग अधिकारी प्रकाश गायकवाड यांची बदलीची मागणी भाजपने केल्यावर त्यांना बदलण्यात आले. त्यामुळे आता धैर्यशील जाधव यांच्यावर कोणती कारवाईआयुक्त करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आयुक्त देशमुख हे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या सूचनांनुसार काम करत असल्याचा ठपका आयुक्तांवर असल्याने दोन महिन्यांपासून त्यांच्याविरोधात आंदोलनाचा सूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आळवल्याची चर्चा आहे. पालिकेमध्ये विरोधकांची भूमिका सत्ताधारी निभावत असल्याने ते असे का वागतात याचीच चर्चा मंगळवारी पालिका इमारतीमध्ये सुरू होती.