हेक्सवर्ल्ड सीटीच्या २३४४ गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे प्रकरण
जागेची मालकी नसताना आणि गृहप्रकल्पासाठी लागणाऱ्या परवानग्या न मिळविता सामान्य गुंतवणूकदारांना हेक्सवर्ल्ड नावाच्या गृहप्रकल्पामध्ये घर देतो, असे सांगून सूमारे ४४ कोटी रुपये गोळा केले, जमवलेली रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी खर्च केल्याचा ठपका ठेवून पंकज व समीर भुजबळ बंधूंसह इतर तिघांविरोधात नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पनवेल येथील न्यायालयात गुरुवारी सात हजार ९२४ पानांचे दोषारोप पत्र दाखल केले.
२००८ साली भुजबळ बंधू खासदार व आमदार असतानाच्या काळात ही फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. खारघर परिसरातील रोहिंजण गावाजवळील २५ एकर जमिनीवर हेक्सवर्ल्ड रेंटल हाऊसिंग प्रकल्प उभारण्याचे स्वप्न गुंतवणूकदारांना बेलापूर येथील बडय़ा पार्टीत दाखविण्यात आले होते. देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या नावाची कंपनी स्थापन करून त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मुंबई व उपनगरातील दोन हजार तीनशे ४४ गुंतवणूकदारांनी यामध्ये ४४ कोटी ४ लाख ९६ हजार ६९७ रुपये गुंतवले. ३० ते ३५ लाखात २ बीएचके आणि १८ लाखांत वन बीएचके घर चार वर्षांत बांधून देतो असे आश्वासन या गुंतवणूकदारांना देण्यात आले होते. अनेक वर्षांनंतरही हक्काच्या घराचे बांधकाम पूर्ण होत नाही, हे पाहून गुंतवणूकदारांनी देवीशा कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तगादा लावला. अखेर तळोजा पोलीस ठाण्यात १३ जून २०१५ रोजी देवीशा कंपनीचे संचालक पंकज छगन भुजबळ, समीर मगन भुजबळ, राजेश माधव धारप, सत्यन अप्पा केसरकर, अमितरबलराज चंद्रकुमार श्रीवास्तव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सात महिने व २५ दिवसांमध्ये अनेकदा भुजबळ बंधूंची व इतर संचालकांची चौकशी नवी मुंबई पोलिसांनी केली. सूमारे २२४ गुंतवणूकदारांची साक्ष दोषारोप पत्रात नोंदविण्यात आली. तर १५ बँक खात्यांचा तपशील या गुन्ह्य़ात घेण्यात आला. देवीशा कंपनीमध्ये काम करणाऱ्यांपासून ते संचालक अशा ५० जणांची चौकशी करण्यात आल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी हे दोषारोप पत्र तयार केले.

हक्काचे घर कधी मिळणार?
आर्थिक गुन्ह्य़ाच्या या प्रकरणातील संशयित आरोपींना चौकशीदरम्यान एकदाही अटक करण्यात आली नाही. वेळोवेळी देवीशा कंपनीची माहिती देण्यासाठी भुजबळ बंधू सहकार्य करत असल्याने अटक करण्याची वेळच आली नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण आहे. न्यायालयात दोषारोप पत्र सादर केल्यामुळे यापुढे हे प्रकरण न्यायालयात सुरू राहील. यापुढे या आरोपींना समन्स काढून न्यायालयात बोलावले जाईल. चौकशी वेळी पोलिसांनी हेक्सवर्ल्ड या गृहप्रकल्पाला सील ठोकले. १८ लाखांत भुजबळ घर देणार म्हणून अनेकांनी व्याजाने पैसे काढून या प्रकल्पामध्ये आपली आयुष्याची कमाई गुंतवली.