उरण परिसरात दररोज ये-जा करणाऱ्या हजारो कंटेनरच्या बेशिस्त व बेजबाबदारपणामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. उरण-पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ वर जासई येथे गुरुवारी झालेल्या दोन अपघातांत दुचाकी वाहनावरून जाणाऱ्या महिलेचा जड वाहनाची धडक लागून मृत्यू झाला. तर द्रोणागिरी नोडमध्ये एका तरुणाचा कंटेनरच्या धडकेने मृत्यू झाला. दास्तान फाटा येथे तर एका रुग्णवाहिकेलाच जड वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या वाढत्या अपघातांमुळे दुचाकी, हलक्या वाहनाने प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे झाले. या पाश्र्वभूमीवर महामार्ग ४ ब व राज्य महामार्ग ५४ या दोन्ही महामार्गासाठी स्वतंत्र मार्गिका देण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रचंड लांबीच्या व जड वाहनांची धडक लागून आतापर्यंत शेकडो जणांना जीवाला मुकावे लागले आहे. या जड वाहनांच्या बाबतीत रहदारीसाठी असलेले नियम, धोक्याचा इशारा देण्यासाठी असलेले इंडिकेटर, क्लीनर नसणे आदी समस्या आहेत. उरणमधील सामाजिक संस्थांनी या गोष्टी वाहतूक विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. या संदर्भात पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूकदार, नागरिक, चालक यांच्या संयुक्त बैठकाही घेतल्या आहेत. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. खोपटा, कोप्रोली, चिरनेर, विंधणे, दिघोडे, वेश्वी, दादरपाडा या परिसरातही जड वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे उरण पूर्व विभागातही अपघातांची संख्या वाढू लागली आहे. वाहतूक पोलिसांकडून यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उरणच्या वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांनी सांगितले. धोकादायकरीत्या वाहन चालविणे, बेशिस्त यासाठी गेल्या अडीच महिन्यांत २० लाखांचा दंडही वसूल केल्याचे ते म्हणाले.