महावितरण कंपनीने जुलै महिन्यापासून वीजदरात १५ टक्क्य़ांपेक्षा अधिक वाढ केल्याने ग्राहकांना जोराचा झटका बसला आहे. महागाईमुळे महिन्याचे बजेट आधीच कोलमडले असताना महावितरणने दरवाढ करून नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे. ही दरवाढ अपेक्षित होती, असा दावा महावितरण कंपनीकडून होत आहे.
कांदा, डाळी तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. सणासुदीचे दिवस जवळ आले असल्याने जमा-खर्चाची मोट कशी बांधावी, अशा पेचात सर्वसामान्य नागरिक असतानाच महावितरण कंपनीने वीजदरात वाढ करून आणखी एक संकट उभे केले आहे.
या वीजदर वाढीसंदर्भात विचारणा करण्यासाठी ग्राहकांनी वीज मंडळाचे कार्यालय गाठण्यास सुरुवात केली आहे. मात्र आधी देयक भरा त्यानंतर पाहू, अशी उत्तरे महावितरणकडून दिली जात आहेत, असे उरणमधील वीजग्राहक महेश चंद्रकांत घरत यांनी सांगितले, तर अनेकांना वापरापेक्षा अधिक देयके येत असल्याने हा प्रकार अन्यायकारक असल्याचा आरोप फुंडे येथील राजेंद्र ठाकूर यांनी केला.
उरणमध्ये अनियमित वीजपुरवठा होत असल्याने व्यवसायावर परिणाम झाला असता त्यात सुधारणा न करता वीजदरात वाढ करून ग्राहकांची लूट केली जात असल्याकडे व्यावसायिक मनोज ठाकूर यांनी लक्ष
वेधले.
पावसाने दडी मारल्याने विजेची मागणी वाढली आहे. महावितरण कंपनीने १०० युनिटपर्यंतची दरवाढ कमी प्रमाणात केली असली तरी त्यानंतरच्या टप्प्यात १५ टक्के वाढ केली असल्याची माहिती उरण महावितरणचे अतिरिक्त अभियंता पी. एस. साळी यांनी दिली.