‘हर हर मोदी’ विरुद्ध ‘बास, किती सहन करणार?’

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरीही फलकबाजीतून आरोप-प्रत्यारोप करत वातावरण तापवण्यास सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. एकीकडे भाजप आपल्या फलकांतून ‘हर हर मोदी’ची घोषणा पनवेलकरांवर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे, तर शेतकरी कामगार पक्षाने ‘बास, किती सहन करणार?’ असा सवाल करत पनवेलमधील पायाभूत समस्यांवर बोट ठेवले आहे. राजकीय पक्षांच्या या चढाओढीत फलकांसाठी जागा भाडय़ाने देणाऱ्यांचे मात्र फावले आहे.

आपला पक्षच पनवेलमधील समस्या सोडवण्यास सक्षम आहे आणि अन्य पक्ष कसे कुचकामी ठरले आहेत, हे पटवून देण्याची अहमहमिका पनवेलमधील राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यासाठी विविध कल्पना लढवल्या जात आहेत. फलक लावण्याच्या अधिकृत जागा राजकीय पक्षांनी पाडव्यापर्यंत बुक करून ठेवल्या आहेत. पनवेल शहर परिसरात महापालिकेने एकूण ४२ जागा फलकांसाठी दिल्या आहेत. त्यापैकी ३२ जागांचे व्यवहार पालिका प्रशासन पाहते तर उर्वरित १० जागांची जबाबदारी कंत्राटदाराला देण्यात आली आहे. दिवसाला ५०० ते १५०० रुपये आकारले जातात.

भारतीय जनता पक्षाने ‘हर हर मोदी’चा नारा देत ‘घर घर मोदी’पर्यंत आपली मजल मारली आहे. पालिकेच्या इमारतीसमोरच हा फलक लावण्यात आला आहे. तसेच आसूडगाव येथील पेट्रोलपंपासमोर देशाचा भलामोठा नकाशा लावण्यात आला आहे. त्यावर भारतील सर्वच राज्ये कशी ‘भगवी’ होत चालली आहेत, हे दर्शवण्यात असा जाब विचारून मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. पनवेलकरांना दिवसाआड मिळणारे पाणी, रस्त्यांची दुर्दशा, रस्तांमधील खड्डे व प्रवाशांची तारांबळ असे प्रश्न त्यांनी आपल्या फलकांतून अधोरेखित केले आहेत.

शहरात ही स्थिती असताना सिडको वसाहतींमधील शहरी व बहुभाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेकापने इंग्रजी व हिंदीचाही आधार घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी अमराठी मतदारांना माहिती आहे, पण शेकाप अद्याप या मतदारांपर्यंत पोहोचला नव्हता. त्यामुळे या अमराठी मतदारांना स्वतची ओळख करून देण्यासाठी शेकापने हा भाषाबदल केला आहे.