घरफोडी व चोऱ्यांची वाढती प्रकरणे पाहता पोलिसांनी प्रत्येक सोसायटी, दुकानदार, कारखानदार यांना सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन केले असून त्याला प्रतिसाद म्हणून अनेकांनी असे कॅमरे लावून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पोलिसांच्या या खबरदारीवर चोरांनीही उपाय शोधून काढले आहेत. चोरी किंवा घरफोडी करण्याअगोदर चोऱ्यांच्या टोळीतील एक जण सीसी टीव्ही कॅमेरा व डीव्हीआर फोडण्याचे काम करीत असल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. यात काही चोर तोंडावर काळा बुरखा परिधान करीत असल्याचेही दिसून आले आहे. यावर उपाय म्हणून पोलिसांनी डीव्हीआरची एक जोडणी इंटरनेटद्वारे दुसऱ्या ठिकाणी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कॅमेऱ्यांनाही सुरक्षा जाळ्या लावाव्यात, असा उपाय सुचविला आहे.
राज्यातील काही बडय़ा शहरात सोनसाखळीं चोरांची संख्या वाढली आहे. त्यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी स्थानिक प्राधिकरणांच्या माध्यमातून सीसी टीव्ही कॅमरे लावण्यात येत आहेत. या कॅमेऱ्यांचा तपासाच्या दृष्टीने उपयोग होत असून पोलिसांना या कॅमेऱ्यांचा आधार आहे. त्यामुळे प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी, दुकानदार, औद्योगिक वसाहतीतील कारखानदार यांना सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यास पोलिसांनी बंधनकारक केले आहे. मात्र चोरांच्या नव्या क्लृप्तीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. ऐरोली सेक्टर १७ मधील एका सोसायटीतील घरफोडीत चोरटय़ांनी बुरखे घातल्याचे आढळून आले. त्यामुळे चोरी केल्याचे सीसी टीव्हीचे फूटेज तर मिळाले पण चोरांचे चेहरे दिसून येत नसल्याने पोलिसांसमोर तपासाच्या अडचणी वाढल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अशावेळी केवळ देहबोलीने चोरटय़ांना पकडण्याचे एक मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. भिवंडी एमआयडीसीतील एका कारखान्यात चोरी करण्यापूर्वी चोरटय़ांनी बुरखा घालून प्रथम कॅमेरे तोडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या कारखान्याला सुरक्षारक्षक असताना ही चोरी झाली. या सुरक्षारक्षकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्याची बोलती बंद झाली होती. कारखान्यातील इनव्हर्टर बनविण्याची यंत्रे या चोरटय़ांनी लंपास केली. यावेळी जाताना या चोरांच्या टोळीने सीसी टीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर तोडल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांपेक्षा चोरटे सवाई होत असल्याचे दिसून येत आहे.
चोरांच्या ह्य़ा वेगवेगळ्या क्लृप्त्यांमुळे पोलीस हैराण झाले असून सीसी टीव्ही कॅमऱ्याद्वारे होणारे चित्रीकरण इंटरनेटद्वारे इतर ठिकाणी किंवा एखाद्या खोलीत डीव्हीआर राखून ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद न होणाऱ्या चोरटय़ांनी आता घरफोडी करताना नामांकित कंपन्याच्या तिजोऱ्यादेखील सहजासहजी तोडण्याचा हातखंडा आत्मसात केला असून वाशी सेक्टर १७ येथील एका आठवडय़ापूर्वीच्या चोरीत ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. त्यामुळे मौल्यवान वस्तू घरी न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत.

बुरखा घालणाऱ्या चोरटय़ांच्या हालचालींवरून पोलीस मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असतात. यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांना या जाळ्या लावणे किंवा कॅमरे चोरटय़ांना दिसणार नाहीत अशा ठिकाणी लावण्याच्या उपाययोजना सोसायटी, दुकानदार यांनी करायला हव्यात. याशिवाय सीसी टीव्ही कॅमेऱ्यात होणाऱ्या चोरटय़ांच्या हालचाली टिपता याव्यात यासाठी हे फुटेज इतर ठिकाणी संगणक, इंटरनेटद्वारे संग्रहित राहील याची काळजी घ्यावी.
अरुण वालतुरे, साहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस