उरण : उंची रोधकामुळे उरण-पनवेल या मुख्य मार्गावरील एसटीची प्रवासी बससेवा मागील तीन वर्षांपासून बंद आहे. हे उंची रोधक सोमवारी रात्री अखेर हटविण्यात आले आहेत. त्यामुळे बोकडवीरा, फुंडे, डोंगरी आणि पाणजे येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल आनंदही व्यक्त केला जात आहे. मात्र हे उंचीरोधक हटविण्यात आल्याने मार्गावरील एसटी बससेवा पूर्ववत करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

नवी मुंबई वाहतूक विभागाने उरण-पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडीपुलाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले उंचीरोधक हटविण्याची अधिसूचना आठवड्यापूर्वी काढली होती. त्यामुळे मार्गावरील उंचीरोधक लवकरात लवकर हटविण्याची मागणी करण्यात येत होती. अखेरीस रात्रीच्या वेळी वाहतूक विभाग आणि सिडकोच्या माध्यमातून हे उंचीरोधक हटविण्यात आले आहेत. उंचीरोधकामुळे मागील तीन वर्षांपासून या मार्गावरील प्रवासी वाहतुकीचे एकमेव साधन असलेली एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेनंतर सिडकोने उरण- पनवेल मार्गावर बसविण्यात आलेले बोकडवीरा आणि फुंडे हायस्कूलनजीकचे उंची रोधक हटविण्यात आले आहेत. शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक यांनी उंची रोधक हटवण्याची मागणी केली होती.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत दिबांच्या नावाने मतांचा जोगवा

खाडीपूल दुरुस्तीसाठी बोकडवीरा ग्रामस्थ आणि जनवादी महिला संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याला यश आले आहे. २०२१ सालापासून उरण-पनवेल मार्गावरील खाडीपूल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे येथील बोकडवीरा, फुंडे, डोंगरी व पाणजे या चार गावातील हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे.

हेही वाचा : नवी मुंबईत ८० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी

मागील तीन वर्षांपासून बोकडवीरा मार्गे बंद करण्यात आलेली एसटी बस सेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांनी उरणच्या एसटी विभागाकडे केली आहे.