नवी मुंबई : करोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाबरोबर पोलिसांचीही लढाई सुरू आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त, सोसायटय़ांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. तसेच आता आदेश झुगारणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांनाच पुढे राहावे लागत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरं बऱ्यापैकी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र आरोग्य प्रशासन आणि पोलीस यांना मात्र रस्त्यावर उतरून काम करावे लागत आहे. अलगीकरण कक्षास बंदोबस्त पुरवणे, जनजागृती करणे, प्रत्येक सोसायटीत जात नागरिकांत जनजागृती करण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. त्याचप्रमाणे या परिस्थितीत आडमुठी भूमिका घेणाऱ्यांना पोलीस खाक्या दाखविण्याचे काम करावे लागत आहे. हे सर्व करीत असताना स्वत:चीही काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

पोलिसांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या बाबत गुरुवारी पोलीस उपायुक्त कार्यालयात सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बैठक घेण्यात आली. त्यांना सॅनिटायजर, हातमोजे, मास्क आदी साहित्य पुरवण्यात येणार आहे.

करोना विरोधातील लढाईत पोलीसही सज्ज आहेत.  आदेश वा सूचनांचे तंतोतंत पालन केले जात आहे. तसेच या लढाईत पोलिसांनी निरोगी असणे आवश्यक असल्याने पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी करोनापासून स्वत:चा बचाव कसा करावा यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रत्येक पोलीस ठाण्यात मिळणार आहे.

– पंकज डहाणे, उपायुक्त, परिमंडळ एक