दुरुस्तीनंतरही कोपरखैरणेत सलग तिसऱ्या दिवशीही वीजपुरवठय़ाचा खेळखंडोबा सुरूच आहे. गुरुवारी दिवसभर वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. कोपरखैरणे सेक्टर १९ सी आणि सेक्टर १७ च्या परिसरात हे प्रमाण अधिक होते.

सोमवारी रात्री कोपरखैरणेत अनेक ठिकाणी वीज वितरणात अडचणी आल्याने मंगळवारी सात तासांचा ‘शट डाऊन’ घेत महावितरणने वीज दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे ही समस्या संपेल असे ग्राहकांना वाटत होते. मात्र त्यानंतर लागेच सायंकाळी वीज गायब झाली. त्यानंतर बुधवारी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच कोपरखैरणे सेक्टर १७ व १९ सीमध्ये बारा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. अशीच परिस्थिती गुरुवारीही होती. सकाळी आकाराच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला तो संध्यकाळी चारनंतर सुरळीत झाला. यासंदर्भात महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांनी, वारंवार रोहित्रास गळती लागण्याने हा प्रकार होत आहे, तसेच उपकरणांचाही तुटवडा असल्याचे सांगितले, मात्र उपकार्यकारी अभियंता आर. एस. राठोड यांनी, असा काही प्रकार नसून योग्य त्या उपाययोजना करू असे सांगितले.