देशाच्या विकासात सर्वात महत्त्वाचा घटक वाहतूक व्यवस्था असून सार्वजनिक आणि औद्य्ोगिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली तरच देशाची प्रगती चांगली होऊ  शकते. त्यामुळे नवीन राष्ट्र घडविण्यासाठी वाहन उत्पादकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे उत्पादकांनी दर्जेदार सुविधा देत असताना पुढील २० वर्षांचा विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले. तर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘एसटी’ आता सीएनजी वा एलपीजीवरही धावणार असून तसा विचार सुरू असल्याची माहिती दिली.

‘हिंदुस्थान बस ऑपरेटर महासंघा’च्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रवास २०१९’ या प्रदर्शनाचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

ते म्हणाले की, नवीन राष्ट्र घडविण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. शहर वाहतुकीत सुधारणा आवश्यक असल्याचे सांगत मुंबईमध्ये ‘बेस्ट’चे भाडे कमी केल्याने नऊ लाख प्रवासी वाढल्याचा दावा त्यांनी केला. बेस्टच्या ताफ्यात सध्या तीन हजार बसेस आहेत. मात्र येत्या तीन वर्षांत त्यांची संख्या थेट दहा हजार होणार आहे. या सर्वच गाडय़ा वातानुकूलित असणार असून त्यांपैकी ५०० बसेस या इलेक्ट्रिक असणार आहेत. महामार्गावर इलेक्ट्रिक बसेस आणि अन्य वाहने धावण्यासाठी ठिकठिकाणी सौर ऊर्जेवरील चार्जिग स्टेशन उभे करणे ही काळाची गरज आहे, तसेच लंडनच्या धर्तीवर आपणही सर्व सर्वजनिक प्रवास एकाच तिकिटावर करण्याचे प्रयत्न करीत आहोत. असेही आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले.

या प्रसंगी शिवसेना नेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते, मिझोरामचे परिवहनमंत्री लालमूनतून लुवांगा, के. टी. राजशेखर, प्रसन्न पटवर्धन, के. अफझल, रोहित श्रीवास्तव, सुभाष गोयल, हर्ष कोटक, दीपक नाईक, थॉमस डी. के. आदी उपस्थित होते.

बदलत्या तंत्रज्ञानावर भर

या प्रदर्शनात देश-विदेशातील जवळपास सर्व कंपन्यांनी स्टॉल्स लावले असून या अनोख्या प्रदर्शनात गाडय़ांचे सुटे भाग काढून ठेवण्यात आले होते. त्यामुळे गाडी दुरुस्ती करणारे व गाडी चालवणारे यांनी नेमके गाडीत बदलते तंत्रज्ञान काय आहे हे सहज समजण्यास सुलभ होत होते. प्रवासी वाहन आणि माल वाहनांचेच प्रदर्शन लावण्यात आले होते.