चौथ्या बंदरातील परप्रांतीय कामगारांविरोधात आंदोलनाचा इशारा

जेएनपीटीमधील सिंगापूर या चौथ्या बंदरातील नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना संधी देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी शिवसेनेने मोर्चा काढला. बंदरातील परप्रांतीयांनी काम सोडून जावे, अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी मोर्चाच्या आयोजकांनी दिला.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे व माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. मोर्चा चौथ्या बंदरासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गाने बंदराच्या प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात आला होता. तिथेच सभा घेण्यात आली. मोर्चात प्रकल्पग्रस्त १८ गाव तसेच उरण तालुक्यातील स्थानिकांना नोकरीत सामावून घ्या, ज्या स्थानिकांच्या मुलाखती बंदर व्यवस्थापनाने घेतल्या आहेत, त्यांना त्वरित कामावर रुजू करून घ्या, भरावामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांचे पुनर्वसन करा, बंदरामुळे होणाऱ्या अपघातांची भरपाई द्या, परप्रांतीयाना कामावरून कमी करा, जीटीआय, एनएसजीटी या बंदरातही स्थानिकांना रोजगार द्या, तालुक्यातील अपंगांना रोजगार द्या, आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चानंतर शिष्टमंडळाने जेएनपीटी आणि सिंगापूर बंदराच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

मंत्र्यांची पाठ

या मोर्चाला राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे व सुभाष देसाई उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र या दोघांनीही या मोर्चाकडे पाठ फिरवली.

खासदार बारणे यांची सरकारवर टीका

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. ‘भाजपचे सरकार हे घोषणाबाज सरकार आहे. त्यांनी देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून केवळ कागदावर न्याय दिल्याचे दाखवत आहेत. बंदरातील नोकऱ्यांत स्थानिकांना प्राधान्य दिले नाही तर बंदर बंद पडले तरी चालेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.