23 October 2018

News Flash

वाशी खाडीपुलाचे काम मार्चपासून?

तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वारस्य निविदा पुढील आठवडय़ात, प्रकल्प खर्च वाढण्याची शक्यता

नवी मुंबईत येत्या दोन वर्षांत उभ्या राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरुळीत व्हावी यासाठी सिडको आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने वाशी खाडीपुलावर बांधण्यात येणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाची स्वारस्य निविदा येत्या मंगळवारी खुली होणार आहे. मार्चमध्ये या कामाला सुरुवात होणार आहे. तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शीव-पनवेलच्या महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे पाच वर्षांपूर्वी या मार्गावर २३ किलोमीटरचे सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यात आले. क्राँक्रीटीकरण व सहा मार्गिका झाल्याने या मार्गावरून भरधाव वाहतूक होऊ लागली. ही वाहतूक वाशी खाडीपुलावर येऊन थांबत असल्याने सकाळ-संध्याकाळी या पुलावर दोन्ही बाजूंना मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. काही महिन्यांपूर्वी या पुलाला तडे गेले होते. राज्य रस्ते विकास महामंडळाने यावर उपाय म्हणून सहा वर्षांपूर्वी तिसऱ्या खाडीपुलाची योजना आखली होती मात्र त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावर पावसाळी अधिवेशनात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना या पदावरून दूर करण्यात आले होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या प्रकल्पाला चालना दिली. विमानतळ आणि नवी मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०० कोटी रुपये सिडकोकडून देण्याची तयारीदेखील दर्शवली. प्रकल्पाचा खर्च ७७५ कोटी ५८ लाखांवरून वाढून एक हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमएसआरडीसी व सिडको प्रत्येकी २०० कोटी रुपये गुंतवणूक करणार असून उर्वरित रक्कम कंत्राटदार उभारणार आहे. वसुलीसाठी टोलमध्ये वाढ करून त्याची मुदतही वाढवली जाणार आहे.

सहा निविदाकार

जागतिक पातळीवरील सहा निविदाकरांनी यात स्वारस्य दाखविले आहे. यापैकी या प्रकल्पासाठी आर्हतायोग्य असलेल्या निविदाकरांची पुढील आठवडय़ात मंगळवारी निवड केली जाणार आहे.

First Published on January 12, 2018 1:45 am

Web Title: vashi creek bridge work