धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची रखडपट्टी; पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची ग्रामस्थांना भीती
उरण तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला नागाव पिरवाडी समुद्रकिनारा पावसाळ्यातील महाकाय लाटांमुळे उद्ध्वस्त झाला आहे. या किनाऱ्यावरील झाडे उन्मळून पडून समुद्राचे पाणी येथील गावातील शेतीत शिरू लागले आहे.या किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून ४ कोटींच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. मात्र मे २०१५ मध्ये शासनाने या बंधाऱ्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने करावे असे आदेश काढले आहेत.त्यामुळे नागाव-पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील धूप संरक्षक बंधाऱ्याचे काम लांबणीवर पडणार आहे.परिणामी यावर्षीच्या पावसाळ्या जून व जुलैमध्ये ४ ते ५ मीटर उंचीच्या येणाऱ्या महाकाय लाटांमुळे या गावांना पाणी शिरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
नागावचा समुद्रकिनारा हा मुंबई, नवी मुंबई तसेच पनवेलसह रायगड जिल्ह्य़ातील पर्यटकांना नेहमीच खुणावतो. एक दिवसाचे पर्यटनस्थळ म्हणून शेकडो पर्यटक नागाव किनाऱ्यावर येतात. सुट्टीच्या दिवशीतर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या मोठी असते.त्यामुळे येथील स्थानिकांना काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत आहे.तसेच अनेकांनी मुंबईतील तसेच इतर ठिकाणच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्सही बांधले आहेत. या किनाऱ्याची पावसाळ्यात येणाऱ्या महाकाय समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्याची गेली अनेक वर्षे धूप होत आहे.त्यामुळे किनाऱ्यावरील शेकडो वर्षांची नारळी, फोफळींची झाडे उखडून पडली आहेत.त्याचप्रमाणे लाटांमुळे किनाऱ्यावरील स्मशानभूमीही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.तर किनाऱ्याची धूप वाढू लागल्याने नागाव परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरील गोडय़ा पाण्याच्या विहिरींवरही परिणाम होऊ लागला आहे.तसेच येथील शेतीतही खारे पाणी शिरू लागल्याने शेती उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे.
नागाव किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने येथील ४०० मीटर लांबीचा बंधार बांधण्याचे काम मंजूर केलेले होते.त्यासाठी २०१५ मध्ये ४ कोटी रुपये खर्चाची निविदाही काढण्यात आलेली होती. मात्र शासनाने या संदर्भात निर्णय घेत २१ मे २०१५ ला धूप प्रतिबंधक बंधारे सार्वजनिक बांधकाम खात्याने पूर्ण करावेत असे आदेश काढल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अभियंते एम.एस.मेतकर यांनी बोलताना दिली.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते या संदर्भात काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.तसेच नव्याने निविदा काढण्यात येणार आहे की,मेरिटाइम बोर्डाच्याच निविदांचा वापर होणार याची निश्चिती नसल्याने दीड महिन्यावर असलेल्या पावसाळ्यापूर्वी हा धूप प्रतिबंधक बंधारा होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती या विभागाच्या पंचायत समिती सदस्या माया काका पाटील यांनी दिली.