लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : संध्या सर्वत्र तापमानात विक्रमी वाढ होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत. त्यात घणसोली गावात पुन्हा १८ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. बुधवारी रात्री ११ वाजता वीजपुरवठा खंडित झाला तो गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सुरु करण्यात आला. धक्कादायक म्हणून घणसोली गावात तीन दिवसांपूर्वीच तब्बल २० तास वीजपुरवठा खंडित झाला होता. विजेची मागणी वाढल्याने केबल स्फोट झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे.

तीन दिवासांपूर्वी घणसोली गावातील बहुतांश ठिकाणी २० तास तर दोन दिवसांपूर्वी ऐरोली येथे १० तास वीज खंडित झाली होती. तर बुधवारी रात्री ११च्या सुमारास पुन्हा घणसोली गावातील शिवाजी तलाव परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. तर काही ठिकाणी सकाळी पाच वाजता वीज पुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा गुरुवारी साडे पाचच्या सुमारास सुरळीत झाला. अशी माहिती अंजली देशमुख या रहिवासी महिलेने दिली. महावितरणाचा ओंगळ कारभाराचे दर्शन गेले काही दिवसात सातत्याने होत असून याचा सर्वाधिक फटका घणसोली आणि ऐरोली भागाला बसत आहे.

आणखी वाचा-नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी

जुनाट सिडकोकालीन वीजवाहिन्या

घणसोली गावातील वीज वाहिन्या या सिडकोकालीन जुनाट, कमकुवत झालेल्या आहेत. २५ ते ३५ वर्षे जुन्या वीजवाहिन्या त्यात अनेकदा रस्ते खोदणे, सिमेंट काँक्रीटीकरण, डांबरीकरण होत असल्याने केबल्सची अवस्था आणखी खराब होते. त्यामुळे या केबल्सच जादा विजेचा भार सहन करू शकत नाहीत आणि ठिकठिकाणी छोटे छोटे स्फोट होऊन केबल जळते. अशा ठिकाणची अनेक वर्षांपासून तात्पुरती दुरुस्ती होत असल्याने आता केबल्स जादाचा वीज भार सहन करू शकत नाहीत.

आणखी वाचा-प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे

दुसऱ्या दिवशीही ठाण्यासह बदलापुरात विजेचा लपंडाव

  • उन्हाचा कडाका वाढला असताना गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ येथील काही भागांत विद्याुत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
  • शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.
  • भारनियमनाचा विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या.
  • बुधवारी मध्यरात्री बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईतील काही भागांत विद्युत पुरवठा खंडित झाला.
  • कळंबोली येथेही काही भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. ठाणे शहरातील कोकणीपाडा, लोकमान्य नगर परिसरात विजेचा लंपडाव सुरू होता. डोंबिवली, कल्याण शहरामध्ये ठिकठिकाणी विद्युत पुरवठा विविध तांत्रिक कारणांमुळे वीज खंडीत झाली.
  • ठाणे जिल्ह्यात बुधवारी दुपारी विजेची मागणी वाढली. दुपारी दोन तासांसाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई भागांतील विद्युत पुरवठा खंडीत झाला.
  • ऐरोलीत महावितरण अघोषित भारनियमन करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another 18 hour power cut in ghansoli village mrj