तीन दुचाकीचालक ठार; शालेय बसला अपघात
ठाणे-बेलापूर मार्गावर सोमवारचा दिवस अपघाताचा दिवस ठरला. घणसोली, महापे येथे बाह्य़ वळणावर झालेल्या अपघातामध्ये दोघे बाइकस्वार ठार झाले. तर ऐरोली भारती बिजली येथे स्कूल बसचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या विचित्र अपघातात एनएमएमटी, रिक्षा व मिनी बस यांचे नुकसान झाले. यात बसमधील ३४ विद्यार्थ्यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.
घणसोली नाका येथे रात्री साडेबाराच्या सुमारास वाशीहून ठाण्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला वळण घेत असलेल्या एका खासगी कंपनीच्या बसने धडक दिली. या अपघातात नेरुळ येथे राहणारे दुचाकीस्वार विश्वजीत साळवे व मनीष मोहित या दोघांचा जागीच मृत्यू झाला. बसचालक मारुती मोहिते याच्या विरोधात रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बसचालकाला अटक करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ऐरोली भारत बिजली येथे सेंट झेव्हिअर्स शाळेच्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. ही बस ऐरोलीकडून ठाणेच्या दिशेने चालली होती. या बसमध्ये ३४ मुले होती. बसने मिनी बसला व रिक्षाला धडक दिल्यानंतर एनएमएमटीच्या बसला धडक देऊन स्कूल बस थांबली. स्कूल बसचालक केशव त्रिपाठी याच्याविरोधात रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अन्य एका अपघातात महापे येथे पोलिसांच्या बोलेरो गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले, यात हा दुचाकीस्वार ठार झाला.