नवी मुंबई : ‘मिशन ९६’च्या यशानंतर, तळोजा विभागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत केवळ ४८९ दिवसांत इमारतींच्या ५०० छतांचे (स्लॅब) काम पूर्ण करत सिडको महामंडळाने पुन्हा विक्रमी कामगिरी केली.  

सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध विभागांत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या योजनेतील घरे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार यापूर्वी ‘मिशन ९६’अंतर्गत ‘प्रीकास्ट’ या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत सिडकोने महागृहनिर्माण योजनेंतर्गत बामणडोंगरी येथे केवळ ९६ दिवसांत १२ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले होते.

या वेळेस महागृहनिर्माण योजनेंतर्गत तळोजा येथील सेक्टर-२८, २९, ३१ आणि ३७ येथे साकारण्यात येत असलेल्या इमारतींमधील ५०० ‘स्लॅब’चे काम केवळ ४८९ दिवसांत पूर्ण केले. याद्वारे सिडकोने पुन्हा गृहनिर्माण क्षेत्रात कर्तृत्वाची मोहोर उमटवली.

दिवसाला १.०२ ‘स्लॅब’ या विक्रमी वेगाने, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करता सिडकोने हे काम पूर्ण केले. सिडकोतील वास्तुशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभियंते आणि प्रकल्प सल्लागार एएचसी, टीसीई-एचएसए यांनी डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली आखणी करून ही कामगिरी पार पाडली.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने निश्चित केले आहे. यामुळे गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वसामान्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून देत, त्यांचे घराचे स्वप्न साकार करणे सुनिश्चित झाले आहे. ५०० ‘स्लॅब’चे केवळ ४८९ दिवसांत पूर्ण केलेले बांधकाम हा या उद्दिष्टातील ‘मिशन ९६’नंतरचा पुढील टप्पा आहे. – डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको