जासई-वहाळ हद्दीत शासनाचे नियम धाब्यावर बसवून बेसुमार दगड उत्खनन

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
The report of the National Human Rights Commission condemned the violation of human rights under the message
संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालात ठपका
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत

उरण : माती उत्खनन, रस्त्यांची कामे यामुळे उरणमधील नागरिकांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत असताना यामध्ये उरण-पनवेल तालुक्याच्या सीमेवर जासई-वहाळ हद्दीत असलेल्या दगडखाणी आणि स्टोन क्रशरच्या धुरळय़ाने भर पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महसूल विभागाच्या आशीर्वादाने शासनाचे नियम धाब्यावर बसवून दिवसरात्र या भागात क्रशर आणि बेसुमार दगडांचे उत्खनन सुरू असून यामुळे उडणाऱ्या धुरळय़ाने वहाळ-उलवे नोड आणि जासई परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

फक्त या परिसरातच ३०-३५ दगडखाणी आणि २०-२२ क्रशर आहेत. या सर्व दगडखाणी आणि क्रशर हे राजकीय बडय़ा धेंडांच्या आणि उद्योजकांच्या मालकीचे असल्यामुळे या दगड माफियांची प्रचंड मुजोरी आहे. त्यामुळे ते कोणालाही जुमानत नाहीत.

खाणपट्टा संपल्यानंतरही त्या खाणपट्टय़ातून कोटय़वधी रुपयांचे गौण खनिजाचे उत्खनन करून पर्यावरणाचे अतोनात नुकसान या दगड माफियांनी केले आहे. यासंदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि वहाळ ग्रामपंचायतीने  पर्यावरण विभाग आणि महसूल विभागाकडे तक्रारी दिल्या असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

या परिसरात अनेक क्रशर आणि दगडखाणी या अनधिकृत असून त्यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानग्या नसल्याचे पुढे आले आहे. या परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नियमबाह्य दगडांचे उत्खनन करण्यात आले असून येथे एक प्रचंड आकाराचे सरोवर तयार झाले आहे. संपूर्ण उरण तालुक्याला या दगडखाणीत असलेले पाणी पुरेल एवढे पाणी या कृत्रिम सरोवरात आहे. दगडांचे किती खोलीपर्यंत उत्खनन करावे यासाठी शासनाने नियम घालून दिलेले असताना ते नियम सर्रास पायदळी तुडविले जात आहेत. सर्व दगडखाणी आणि क्रशरचालकांना प्रदुषण होणार नाही याबाबत काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच धुरळा उडू नये म्हणून सतत पाण्याची फवारणी केली जाते, अशी माहिती पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

प्रदूषण पसरविणाऱ्या आणि शासनाचे नियम न पाळणाऱ्या दगडखाणींवर आणि क्रशरवर कारवाई केली जाईल. तसेच याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाई करण्याबाबतचे तातडीने पत्र देण्यात येईल असे सांगितले.

या दगडखाणींचा जासईच्या ग्रामस्थांनादेखील त्रास होतो. बडी धेंडं असलेल्या या दगडखाणी आणि क्रशरच्या अनेकांनी या खाणींची ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही. अनेक खाणमालक तर ग्रामपंचायतीला करदेखील देत नाहीत.   – सुनील भोईर, अध्यक्ष, श्री कान्होबा दगडखाणी आणि क्रशर चालक मालक संघ

या परिसरात असलेल्या क्रशर आणि दगडखाणीतून उडणाऱ्या धुळीमुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने याबाबत अनेकवेळा महसूल विभाग, सिडको आणि एमपीसीबीकडे तक्रारी दिल्या आहेत मात्र त्याची दखल घेत नाहीत. प्रशासनाने या दगडखाणींतून होणाऱ्या प्रदूषणाची तातडीने दखल घ्यावी.  – संतोष घरत, सरपंच, जासई ग्रामपंचायत

दिवसरात्र या भागातून धुळीचे लोट उडत असतात. रात्रीच्या सुमारास तर या परिसरात प्रचंड धुळीचे ढग तयार होतात, कधी कधी तर यामुळे समोरचा माणूस दिसत नाही, असे वहाळ ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात प्रचंड प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या परिसरात उघडय़ावर काम करणाऱ्या कामगारांच्या तर रोज मूठभर तरी धुरळा पोटात जात असण्याची शक्यता आहे.  – पूजा पाटील , सरपंच, वहाळ ग्रामपंचायत