नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर

नेरुळ सेक्टर सहा येथील अतिधोकादायक स्थितीतील दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. अडीच एफएसआयद्वारे पुनर्बाधणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या ३९४ चौ.मी. क्षेत्रफळाच्या वादामुळे या सोसायटीच्या पुनर्बाधणीत अडथळा निर्माण झाला होता. परंतु आता सोसायटीलगतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावास महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुनर्बाधणीचा मार्ग मोकळा झाला असून अनेक वर्षे भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या १३६ कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. ‘लोकसत्ता’ने याबाबत वेळोवेळी वृत्ते प्रसिद्ध केली होती.

minister mangal prabhat lodha pay tribute to ramnath goenka
रामनाथ गोएंका यांना आदरांजली
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
ajit pawar
चावडी: अजितदादा आणि ईडी !
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीप्रश्नी स्थानिक नगरसेवक सुरज पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. सोसायटी परिसरात रस्तारुंदीकरण करून सोसायटीच्या पुनर्बाधणीचा मार्ग सुकर करण्यात येईल आणि त्याबाबतचा प्रस्ताव महासभेत आणण्यात येईल, असे आश्वासन नगररचना विभागाने पत्राद्वारे नगरसेवक सुरज पाटील यांना देण्यात आले होते. शनिवारच्या महासभेत दत्तगुरू सोसायटीबाबतचा रस्तारुंदीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला नाही, त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीचे  नगरसेवक सुरज पाटील व सुजाता पाटील यांनी महासभेत आक्रमक भूमिका घेत प्रस्ताव मंजुरीसाठी येईपर्यंत जमिनीवर बसण्याची घोषणा केली. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानेच केलेल्या आंदोलनामुळे व सभात्यागामुळे प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला. पुनर्बाधणीसाठी आवश्यक चटईक्षेत्र मंजूर करण्यासाठी इमारतीच्या बाजूला १५ मीटर व ९ मीटर रुंदीचा रस्ता आवश्यक होता. त्यासाठी पालिकेने उत्तरेला असलेल्या शाळेच्या व मैदानाच्या भूखंडातून ४ मीटर रुंदीची पट्टी रस्त्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे रस्ता दोन्ही बाजूंनी रुंद होणार आहे आणि दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नेरुळ सेक्टर सहा येथील दत्तगुरू सोसायटीतील सुमारे सहाशे रहिवासी रोज भीतीच्या छताखाली झोपी जात होते. सिडको व पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका आम्हाला बसत आहे.

सिडको धोकादायक झालेली इमारत कोसळून जीव जाण्याची वाट बघतेय का?, असा सवाल करत होते. सिडकोने १९८७मध्ये डिमांड रजिस्ट्रेशन स्कीम म्हणजेच डीआरएस योजनेअंतर्गत नेरुळ येथील सेक्टर सहा येथे ए टाईपच्या इमारतींचे नियोजन केले.

सुरुवातीला ए टाईपच्या इमारती नेरुळ सेक्टर २४ येथे बांधल्या जाणार होत्या. नंतर सिडकोने नेरुळ सेक्टर-६ मध्ये ए एक, ए दोन टाईपच्या इमारती बांधल्या. दोन्ही इमारतीत १३६ कुटुंबे आहेत. सुमारे ६०० नागरिक जीव मुठीत घेऊन या धोकादायक इमारतीत राहत आहेत.

इमारती बांधताना दोन इमारतींचे क्षेत्रफळ दोन हजार ३६० चौ.मी. इतके असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात बिल्टअप एरिया नुसार एक हजार १८० चौरस मीटरच क्षेत्रफळ दिले गेले.

दोन इमारतींचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ दोन हजार ३६० चौरस मीटर आवश्यक असताना सिडकोकडे एक हजार ९६६ एवढे नोंदवले आहे. त्यामुळे नियमानुसार हक्काचे असलेले ३९४ चौरस मीटर क्षेत्र कंडोमिनियम प्लॉटमध्ये देण्याची मागणी रहिवासी सिडकोकडे वर्षांनुवर्षे करत होते.

रिक्षाचालक, फुलवाले, हारवाले असे हातावर पोट असणारे या इमारतीत राहतात. १४० चौरस फुटांच्या घरात बीडीडी चाळीसारखे आम्ही राहतो. आमच्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. इमारतीत सतत पडझड होते. ‘लोकसत्ता’ने व लोकप्रतिनिधींनी वारंवार आमचे वास्तव प्रशासनासमोर मांडले होते. त्यामुळे आता आमच्या सोसायटीचा पुनर्बाधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

– राजेंद्र बागल, अध्यक्ष, दत्तगुरू सोसायटी

दत्तगुरू सोसायटीबाबत मुख्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. प्रशासन दत्तगुरूबाबत रस्तारुंदीकरणाचा प्रस्ताव पटलावर घेत नसल्याने सभागृहात ठिय्या मांडून निषेध व्यक्त करत सभात्याग केला होता. आता हा प्रस्ताव मंजूर झाल्याने दत्तगुरूबरोबरच इतर सोसायटय़ांनाही या प्रस्तावाचा लाभ होणार आहे.

– सुरज पाटील, नगरसेवक