१०९ कोटी खर्च; १८ महिन्यांची मुदत

संतोष जाधव

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला शहरासाठी महत्त्वपूर्ण असा नेरुळ येथील विज्ञान केंद्राचा प्रकल्प मार्गी लागला आहे. या केंद्राच्या कामाचे आदेश देण्यात आले असून पावसाळी कालावधी वगळता १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. यासाठी १०९ कोटी खर्च अपेक्षित धरला आहे. शहरासाठी हा प्रकल्प ‘आयकॉन’ ठरणार आहे.

सिडकोकडून विज्ञान केंद्रासाठीचा भूखंड वेगळा करून १ वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकासह करारनामा झाला आहे. त्यासाठी पालिकेने सिडकोला २४ कोटी १४ लाखांचा भरणाही केला आहे. त्यामुळे मागील काही वर्षे प्रत्येक अर्थसंकल्पात कागदावर राहिलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येणार आहे. नेरुळच्या वंडर्स पार्कशेजारीच विज्ञान केंद्राची निर्मिती होणार आहे.

मुंबई, बंगळूरु व पिंपरी चिंचवड शहरात अशी विज्ञान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने शहरात हे केंद्र उभारण्याचे ठरविले होते. सुरुवातीला पालिकेने या ठिकाणी विज्ञान केंद्र तसेच व्हिंटेज कार निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निविदाही मागवण्यात आल्या होत्या. परंतु दोन वेळा फेरनिविदा काढल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. विज्ञान केंद्र या प्रकल्पातून व्हिंटेज कार प्रदर्शनी केंद्र आता वगळण्यात आले आहे. अद्ययावत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य विज्ञानकेंद्र या ठिकाणी बनवण्यात येणार आहे. या वास्तूत व परिसरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. हे केंद्र लहान मुलांसाठी आकर्षण तसेच रोजच्या व्यवहारात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर काय आहे व भविष्यात याचा फायदा याची प्रचीती देणारे ठरावे यासाठी त्यामध्ये विविध विभाग करण्यात येणार आहेत.

पर्यावरण, जीवन, ऊर्जा, यंत्र व रोबोट, अंतराळ या महत्त्वपूर्ण घटकांचा त्याच्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे हे विज्ञान केंद्र शहराबरोबरच युवा पिढीलाही आकर्षित करणारे ठरणार आहे. नवी मुंबईप्रमाणेच लगतच्या इतर शहरांतील नागरिकांसाठी हे केंद्र पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. या कामाला नुकताच कार्यादेश दिला असल्याची माहिती पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

शहरासाठी विज्ञान केंद्र हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच प्रकल्प भूषणावह ठरेल यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

संकल्पना 

विज्ञान केंद्रात निसर्गासोबत कसे राहावे, परग्रहावर मानवास राहता येईल, भविष्यात आपल्यासाठीचे ऊर्जास्रोत कोठून मिळतील, भविष्यातील मनुष्याची कार्यपद्धती व प्रवास कसा असेल अशी संकल्पना असणार आहे.

  • कामाचे नाव :

नेरुळ सेक्टर १९ अ मधील भूखंड क्रमांक ५० ब येथे विज्ञान केंद्र बांधणे.

  • अंदाजपत्रकीय रक्कम : ८७,२६,२२,६६९
  • निविदा रक्कम :

१०९,१,६७, ५००