दिवाळीच्या सलग सुटीचा फायदा घेत बेकायदा मंदिराची उभारणी
सलग सुटीचा फायदा घेत कळंबोली बेकायदा बांधकामे करण्याचा प्रकार अद्यापही सुरू असून नुकत्याच दिवाळीच्या सुटीचा फायदा घेत कळंबोलीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यालयासमोरील मोकळ्या भूखंडावर चक्क मंदिरच उभारण्याचा प्रकार घडला आहे. कार्तिकमासी ह मारुतीचे मंदिर बांधण्यापूर्वी श्रावणमासात श्रीकृष्ण मंदिर बांधण्याचा प्रकार येथील नागरिकांनी केला आहे.
सिडको क्षेत्रामध्ये एकूण १५१ बेकायदा धार्मिकस्थळे उभारली गेली आहेत. कळंबोली वसाहतीमध्ये सर्वाधिक ३२ बेकायदा धार्मिकस्थळे बांधण्यात आली आहेत. या मारुती मंदिरामुळे बेकायदा धार्मिकस्थळांची संख्या ३३ वर पोहचली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे बेकायदा बांधकाम विरोधी कारवाई आणि ते रोखण्याचे निर्देश असतानाही त्याची कोणतीही भीती न बाळगता कळंबोलीत सलग सुटीचा फायदा घेत बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्यात धार्मिक स्थळे उभारण्याचा सपाटा अधिक सुरू आहे. सिडको प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे हे प्रकार होत असून काही राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे नागरिकांकडून हे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे येथे सांगितले जाते.
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी सिडकोने लाखो रुपयांचे साहित्य भाडय़ाने घेतले आहे. त्याचा वापर एकीकडे सुरू असताना दुसरीकडे ही बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा थांगपत्ता सिडकोला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कळंबोली येथील सेक्टर १२ येथे महाराष्ट्र एज्युकेशन विद्यालयासमोर मोकळे भूखंड आहेत. यातील काही भूखंड धार्मिकस्थळांसाठी तर काही भूखंडावर प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याचे नियोजन आहे. मात्र सिडकोने या मोकळ्या भूखंडावर आरक्षणाची पाटी लावलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी या भूखंडावर थेट मंदिराची उभारणी केली आहे. येथील मोकळ्या जागेला कुंपन घातले नसल्याने ही जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे. याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

सेक्टर १२ येथील सिडकोच्या भूखंडावर बेकायदा मंदिर बांधले असल्यास आमच्या विभागाचे अधिकारी स्वत: जातीने जाऊन या मंदिराची पाहणी करतील. त्यात तथ्य आढळल्यास त्याची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सिडकोच्या बांधकाम नियंत्रण विभागाला देण्यात येईल. त्यानंतर जी काही कारवाई करायची आहे, ती केली जाईल.
किरण फणसे, अधीक्षक अभियंता, सिडको