नवी मुंबई: नवी मुंबईतील कोपरखैरणे स्टेशन नजीक आज मनपाने अतिक्रमण विरोधी कारवाई करीत ३० पेक्षा अधिक झोपड्या काढून टाकल्या. या कारवाईत होणारा विरोध लक्षात घेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. मात्र मनपाची कारवाई अचानक थांबवावी लागली आणि पोलीस कारवाई सुरु झाली. याला कारण होते ते अतिक्रमण हटवताना एका मागे एक गांजाच्या पिशव्या सापडू लागल्या . 

नवी मुंबईतील कोपरखैरणे स्टेशन नजीक आणि बालाजी चित्रपट गृहासमोर असलेल्या झोपडपट्ट्या काढून टाकण्यासाठी अतिक्रमण पथकाने आज कारवाई केली. हि कारवाई सुरु असताना  झोपडीत राहणाऱ्यांनी, व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. हा विरोध अपेक्षित असल्याने पोलीस बंदोबस्त हि ठेवण्यात आला होता. मात्र कारवाई करत असताना हळूहळू विरोध मावळू लागला आणि शिस्तीत कारवाई सुरु झाली. दरम्यान एका ठिकाणी झोपडी पाडू नये म्हणून एक व्यक्ती कमालीचा विरोध करत होती. पोलिसांनीही त्या व्यक्तिला समजावून सांगितले. मात्र त्याचा विरोध प्रखर होताना पाहून पोलिसांना संशय आला.

हेही वाचा : पनवेल : एमपीसीबीने बंद केलेल्या १८ पैकी दोन खदाणी सूरु करण्याचे आदेश

पोलिसांनी काही वेळासाठी कारवाई थांबवली व त्या व्यक्तीला पकडून झोपडीची झडती घेतली असता गांजाच्या छोट्या मोठ्या पिशव्या सापडू लागल्या. त्यात पदपाठाखाली त्याने ठेवलेली एक पोतेही आढळून आले त्याची पाहणी केली असता त्यातही गांजा आढळून आला. पोलिसांनी अतिक्रमण कारवाई काही वेळ थांबवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले व सर्व गांजा जप्त केला. प्राथमिक अंदाजाने २० किलो गांजा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : दोन दिवसांच्या कारवाईत ३६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त, अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी तीन महिला
 
अतिक्रमण कारवाई आज सकाळी करण्यात आली असून या कारवाईत एक जेसीबी, चार डंपरचा वापर करीत २५ पेक्षा जास्त कामगारांच्या मदतीने ३० पेक्षा अधिक झोपड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती विभाग अधिकारी सुनील कोठोले यांनी दिली आहे.