नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत तब्बल ३६ लाख २० हजारांचे विविध अंमली पदार्थ जप्त केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही घटनांत महिलांचा सहभाग आढळून आला आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी तीन महिला आहेत तर एक आरोपी फरार असून तीसुद्धा महिलाच आहे.

कोपरखैरणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणारी टोळी उद्ध्वस्त केली असून तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३२ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ साठवणे आणि विकणे सुरू असल्याच्या माहितीवरून कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील नॅशनल अपार्टमेंट, चौथ्या मजल्यावर, सदनिका कमांक ४०४ मध्ये १६ तारखेला पोलीस पथकाने छापा घातला. त्यावेळी मोहम्मद शमिम ईस्माईल अन्सारी उर्फ सॅम, वय (२७) खालीदा खातून मोहम्मद अजीम अन्सारी (२३) आणि आफिया खातुन हयात मोहम्मद अन्सारी (१९) हे पोलिसांच्या हाती लागले. त्यांची अंगझडती व घराची झडती घेतली असता अमली पदार्थ मिळून आले. त्यामुळे गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा…पनवेलमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी वृद्धेला लुटले

या प्रकरणात आरोपींकडून ६ लाख ३० हजार रुपये किमतीची ६३ ग्रॅम वजनाची एम.डी. पावडर, २५ लाख ३० हजार रुपयांची २५३ ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर पावडर व रोख रक्कम १२ हजार ९८० असा एकूण ३१ लाख ७२ हजार ९८० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा…अटल सेतूवरून ‘शिवनेरी’ धावणार

कारवाईच्या दुसऱ्या दिवशी कोपरखैरणे सेक्टर १९ येथे रात्री साडेबाराच्या सुमारास फिरत असलेली संशयित व्यक्ती संतोष राठोड आणि त्याची पत्नी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४५ ग्रॅमची ब्राऊन शुगर आढळून आली. ज्याची किंमत ४ लाख ५० हजार होती. मात्र अंधाराचा फायदा घेत राठोडची पत्नी पळून जाण्यात यशस्वी ठरली. तिच्याकडेही अमली पदार्थ होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण तपास करीत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.