पनवेल : मागील तीन वर्षात कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारातील गोदामांमधून लाखो रुपयांचा माल चोरल्याने व्यापारी त्रस्त होते. अनेक गुन्हे घडल्यानंतरही पोलिसांना आरोपींना पकडण्यात अपयश येत असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात होती. पोलीस आयुक्तांनी कळंबोली पोलीस ठाण्याला नवीन प्रभारी पोलीस निरिक्षक नेमले.

सहा दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी लोखंड बाजारातील १४८७ क्रमांकाच्या गोदामामधून मध्यरात्री ते पहाटेपर्यंत गोदामाचे कडी तोडून त्यांनी गोदाम लुटले. अक्षरशा स्टील चोरीचा मालाची वाहतूक करण्यासाठी टेम्पोचा वापर चोरट्यांनी केला. या चोरीत २६ लाख ५७ हजार रुपयांचा माल चोरला होता. गोदाम मालकाने याबाबत शनिवारी कळंबोली पोलीसांकडे तक्रार नोंदविल्यावर तातडीने वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांनी पोलीस पथकाला कोणत्याही मार्गाने आरोपी आणि माल मिळालाच पाहीजे असा आदेश दिल्यावर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला.

हेही वाचा…पनवेल: शेजारच्याकडून बालिकेवर अत्याचार, उलव्यातील घटना

कळंबोली पोलिसांनी पहिला आरोपी मुंबई येथून सहा लाखांच्या मालासह अटक केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक मंगेश बाचकर यांच्या पथकाने केली. पोलीस आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करणार आहेत. मुंबईतील व नवी मुंबईतील चोरट्यांची टोळी दिवसभरात लोखंड बाजारात टेहळणी करतात. आणि रात्री टेम्पो घेऊन चोरट्यांची टोळी कळंबोलीतील लोखंड बाजारात दबा धरुन बसते.

हेही वाचा…एपीएमसी चटई क्षेत्र घोटाळा प्रकरणी २३ माजी संचालक सभापती सह सचिवा विरोधात गुन्हा दाखल

मध्यरात्रीनंतर गोदामात शिरुन ही चोरी केली जाते. आतापर्यंत लाखो रुपयांचा माल गेला असून यापूर्वीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी या चोऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने चोरट्यांचे फावल्याचा आरोप व्यापारीवर्गाकडून केला जात आहे. स्वतः नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी लोखंड बाजाराला भेट दिली. या भेटीनंतर आयुक्तांनी बाजार समिती व्यवस्थापनाला बाजारात पथदिवे, सीसीटिव्ही कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. मात्र काही ठिकाणी रात्री पथदिवे व सीसीटिव्हीमध्ये स्वतःचे चेहरे कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी वीज पुरवठा खंडीत केल्याचे समोर येत आहे. कळंबोली पोलिसांनी २६ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात अजून आरोपींना अटक करणे शिल्लक असून संपूर्ण टोळीला पकडल्यावर याबाबत सविस्तर माहिती देऊ असे सांगितले. तसेच ज्या गोदामामध्ये ही चोरी झाली आहे त्या मालकाने लगेच पोलीसांना माहिती दिल्याने ही चोरी उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगीतले. गोदाम मालक सतर्क राहील्यास चोरीचे प्रकार लवकर पोलीस उघड करु शकतील असे आवाहन पोलिसांनी केले आहे.